ज्येष्ठा गौरी आगमन : माहेरवाशीणीच्या आगमनाने घराघरांत आनंद

गणेशोत्सवाच्या मंगल वातावरणात आज घराघरांत ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले. गणरायाची जननी आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गौरींचं स्वागत भक्तांनी उत्साह, भक्तिभाव आणि पारंपरिक पद्धतीनं केलं.
सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल ३१ ऑगस्ट २०२५
गौरी पूजनाची परंपरा महाराष्ट्रात शतकानुशतकं जोपासली जाते. “माहेरवाशीण घरी आल्यावर घरात सुख-समृद्धी नांदते” या श्रद्धेने गौरींचे आगमन आजही आनंदोत्सव मानलं जातं. आज आवाहन झाल्यानंतर उद्या १ सप्टेंबर रोजी गौरी पूजन पार पडेल, तर परवा २ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होईल.
घराघरांत देवींच्या मूर्तीचे पारंपरिक शृंगार, रंगीबेरंगी रांगोळ्या, फुलांची सजावट आणि सोलह-अलंकारांनी आजचे वातावरण अधिकच मंगलमय झाले आहे. गौरी पूजनासाठी पारंपरिक पद्धतीनं १६ प्रकारच्या भाज्या, गोडधोड पदार्थ, पापड, लोणची अशा समृद्ध नैवेद्याची तयारी केली जाते.
हा सण केवळ धार्मिक विधी नसून तो कौटुंबिक बंध, नात्यांचा स्नेह आणि स्त्रीशक्तीचा गौरव आहे. गणरायासोबत आलेल्या गौरी म्हणजे घराघरांत समृद्धी, सौंदर्य आणि मंगलाचे प्रतीकच आहेत.
आज महाराष्ट्रात सर्वत्र एकच गजर आहे –
गौराई आगमन झालं गं… घर आनंदानं उजळलं गं.
गणेशोत्सवाचा गजर सुरू झाला की, काही दिवसांनी घराघरांत माहेरवाशीणसारखी गौरी येते.
गणपतीला ‘माता पार्वतीचा लाडका पुत्र’ मानलं जातं. अशी धारणा आहे की, आपल्या मुलाला भेटण्यासाठी गौरी दोन दिवस माहेरवाशीण म्हणून घरी येते. त्यामुळे गणेशोत्सव हा फक्त बाप्पांचा नव्हे तर आई–मुलाच्या संगमाचा सोहळा ठरतो.
गौरी आगमन हा स्त्रीशक्तीचा सण आहे. “गौरी आली म्हणजे घरात सौभाग्य, ऐश्वर्य आणि मंगल येतं” अशी पिढ्यान् पिढ्या चालत आलेली श्रद्धा आहे. पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांनी पिकलेली मूळा, काकडी किंवा सुपारीवर हळदीकुंकवाने सजवून गौरी घरात आणायची प्रथा होती. यातून निसर्ग आणि अन्नदात्या शेतीला प्रणाम करण्याचाही भाव दडलेला होता.
लोककथेनुसार, एकदा पार्वतीदेवी कैलासावरून पृथ्वीवर आपल्या माहेरी आली. तेव्हापासूनच प्रत्येक वर्षी गौरी पूजनाची परंपरा प्रचलित झाली. आजही घराघरांत गौरीचे सोलह अलंकारांनी सजवलेले पूजन करून महिलावर्ग एकमेकींना “गौरीसारखं मंगल नांदो” अशी शुभेच्छा देतात.
थोडक्यात, गणराय म्हणजे उत्साह, तर गौरी म्हणजे मंगल. या दोघांच्या आगमनाने घर-घर उजळून निघतं, आणि गणेशोत्सवाची खरी पूर्णता साधली जाते.