JVM साळाव मध्ये ‘युग मंथन – संस्कारांचा समागम’ वार्षिक स्नेहसंमेलन दणक्यात विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रंगला अविस्मरणीय सोहळा

  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍️ सचिन मयेकर 
  • 📅 शनिवार , २७ डिसेंबर २५

जिंदाल विद्या मंदिर साळाव येथे आज ‘युग मंथन संस्कारांचा समागम’ हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला आणि सुरुवातीला विद्यार्थ्यांनी शोले चित्रपटातील पियानो धूनवर अप्रतिम बॅंड सादरीकरण करताच सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला, त्यानंतर ‘‘देवा तुझ्या दारी आलो’’ या भक्तीगीतावर पुन्हा वाद्यवृंदाचे सादरीकरण झाल्याने वातावरण अधिकच मधूर व मंगलमय झाले, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात होताच स्वागतगीताच्या निनादाने उपस्थितांचे स्वागत झाले आणि मंचावर रंग, प्रकाश व उत्साहाची उधळण जाणवू लागली.

प्रमुख पाहुणे श्री. पंकज मलिक (उपाध्यक्ष JSW ग्रीन स्टील व चेअरमन SMC JVM सलाव) तसेच मिसेस निलू मलिक, सुनील लोणकर, लोणकर मॅडम, जितेंद्र आचार्य, शुभांगी आचार्य, शाळेचे मुख्याध्यापक मुकेश ठाकूर व उपमुख्याध्यापक मंगेश बामनोटे यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या गेल्या पाच वर्षांच्या शैक्षणिक प्रगतीचा व कोरोना काळातील संघर्ष व पुनरुत्थानाचा आढावा सादर करण्यात आला. शाळेत वर्षभर ७२ उपक्रम राबवले जातात, यामुळे विद्यार्थ्यांची कला, संस्कृती, आत्मविश्वास, नेतृत्वगुण व व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो, ‘‘फक्त पुस्तकातील ज्ञान पुरेसे नसते, कृतीतून मिळणारा अनुभवच खरे शिक्षण घडवतो’’ असे सोनिया मॅडम यांनी सांगत संस्कृती आणि परंपरा जपण्याबद्दल अभिमान व्यक्त केला.

मराठी भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन करताना, रक्षाबंधन उपक्रमासाठी शाळेला राष्ट्रभवनात बोलावण्याचा मान मिळणे हीही अभिमानाची बाब आहे, विद्यार्थ्यांमध्ये धैर्य व मूल्ये रुजवण्याचा हा सुंदर उपक्रम ठरला. सामाजिक जाण निर्माण करण्याचे उद्दिष्ट याबाबतही गौरवोद्गार काढण्यात आले. यानंतर लहानग्यांच्या रंगतदार कलाविष्कारांनी सगळ्यांची मने जिंकून घेतली  UKG विद्यार्थ्यांनी ‘‘देवा श्रीगणेशा’’ वर जबरदस्त परफॉर्मन्स दिला, तर पहिलीतील मुलांनी ‘‘धूम मचाले’’वर धमाकेदार सादरीकरण करत प्रेक्षकांना टाळ्यांच्या वर्षावात न्हावून काढले. स्टेजवरील प्रकाश, वेशभूषा, नृत्य आणि मुलांच्या तेजस्वी चेहऱ्यांनी संपूर्ण सभागृह सणासुदीच्या रंगांनी न्हालं.

या वेळी मुख्याध्यापक मुकेश ठाकूर म्हणाले,

समुद्रमंथनावेळी प्रथम विष निघाले पण शेवटी अमृत मिळाले, तसेच जीवनात अडचणी आल्या तरी सातत्य, जिद्द आणि प्रयत्नांनीच यश जन्म घेते. विद्यार्थ्यांना परिस्थितीशी लढण्याची ताकद देणे हेच आमचे ध्येय. ‘युग मंथन’ हा संस्कृतीप्रगतीचा उगवता सूर्य आहे.

मुख्य पाहुणे पंकज मलिक यांनी प्रेरणादायी शब्दांत सांगितले,

“हा सोहळा म्हणजे मेहनत, शिस्त आणि प्रगतीचा उत्सव आहे. शिक्षण म्हणजे केवळ अभ्यास नाही, तर संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडवण्याची प्रक्रिया आहे. यश अंतिम नाही आणि अपयश शेवट नाही  प्रयत्न हेच खरे महत्त्वाचे. आजचा प्रयत्न उद्याच्या यशाचे बीज आहे आणि JVM मधून निघणारे विद्यार्थी उद्याचे सक्षम नागरिक ठरणार आहेत. शिक्षकांशिवाय शाळेचे यश शक्य नाही.”

त्यांनी शिक्षकांचे विशेष कौतुक करत टाळ्यांच्या गजरात त्यांच्या मेहनतीचा गौरव केला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभागृह दणाणून सोडले आणि राष्ट्रगीताने या अविस्मरणीय सांस्कृतिक सोहळ्याचा समारोप झाला.

अखेरीस ‘युग मंथन’ने विद्यार्थ्यांच्या कलेची चमक, संस्कारांची उब आणि आत्मविश्वासाचा प्रकाश उपस्थितांच्या मनात कायमचा कोरून ठेवला.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *