जनता दरबाराचा ‘धडाका’ – सामान्यांच्या प्रश्नांना जागेवरच न्याय
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
✍ सचिन मयेकर | नवी मुंबई (वाशी)
📅 रविवार | १५ फेब्रुवारी
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित जनता दरबारात सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना तात्काळ न्याय मिळाल्याचा अनुभव नागरिकांनी व्यक्त केला. दीन-दुबळे, वंचित आणि गरजू घटकांपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे हीच खरी जबाबदारी असल्याची भावना यावेळी नागरिकांतून उमटली.
जनता दरबारात केवळ तक्रारी ऐकून न घेता, त्यावर जागेवरच निर्णय घेण्याची ठाम भूमिका वनमंत्र्यांनी घेतली. प्रशासकीय दिरंगाईबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत अनेक प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावण्यात आली. उपस्थितांमध्ये “काम होणारच!” असा विश्वास दृढ झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
घरबांधकाम परवानग्या, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, जमीन वाद, तसेच शासकीय योजनांशी संबंधित तक्रारी मोठ्या संख्येने मांडण्यात आल्या. एका वृद्ध नागरिकाच्या जमिनीच्या कागदपत्रांचा प्रश्न वर्षभर प्रलंबित होता; मात्र दरबारात तो अल्पावधीत निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले. एका गरजू कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी तात्काळ शिफारसही करण्यात आली.
कार्यक्रमास माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, उपमहापौर दशरथ भगत तसेच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जनता दरबाराच्या यशस्वी आयोजनामुळे नवी मुंबईकरांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भविष्यात अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सामान्य माणसाला थेट व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम जनतेच्या विश्वासाला अधिक बळ देणारा ठरत आहे.
![]()

