छावा FILMFARE शुक्रवार विशेष लेख—धर्मेंद्र : प्रेम, लौकिक आणि एका सुवर्णयुगाचा शेवट
हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळाची ओळख म्हणजे धर्मेंद्र. देखणेपणा, दमदार व्यक्तिमत्त्व, रोमँटिक स्मित आणि आतून खरं भावनिक हृदय असलेला हा सुपरस्टार आज आपल्या सोबत नाही. २४ नोव्हेंबर २५ रोजी वयाच्या नव्वद वर्षी त्यांचा प्रवास संपला. पण एक गोष्ट मात्र संपली नाही ती म्हणजे त्यांनी जगलेली प्रेमकहाणी. बॉलिवूडच्या इतिहासात आजही सर्वात चर्चित आणि सर्वात भावपूर्ण मानली जाणारी ही कथा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्यातून आकाराला आली होती.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर—शुक्रवार – २८ नोव्हेंबर २०२५
इंडस्ट्रीत दोघांची पहिली भेट झाल्यापासूनच हेमा मालिनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून गेल्या होत्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं, पहिल्यांदाच त्यांना पाहिलं तेव्हा जाणवलं की यांच्याइतकं देखणं व्यक्तिमत्त्व दुसरं नाही. सुरुवातीला त्यांच्या नात्यात लग्नाची भावना नव्हती, पण काळाच्या ओघात नातं गहिरं झालं आणि एक दिवस हेमा मालिनी स्पष्ट म्हणाल्या की आता या नात्यात असे राहता येणार नाही, तुम्हाला माझ्याशी लग्न करावंच लागेल. २ मे १९८० रोजी धर्मेंद्र यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता हेमा मालिनींसोबत लग्न केलं. हा निर्णय प्रचंड धैर्याचा होता. पण हेमा मालिनी म्हणाल्या की मला त्यांच्या संपत्तीची किंवा पैशाची गरज नव्हती, मला फक्त त्यांचं प्रेम हवं होतं. या प्रेमातून त्यांच्या दोन मुली, ईशा आणि अहाना देओल, जगात आल्या.
धर्मेंद्र हे स्टारडमचे सम्राट होते. शोलेमधला वीरू, चुपके चुपकेचा निखळ विनोदी नायक, सत्यकाममधला गंभीर कलाकार आणि फूल और पत्थरमधला अॅक्शन आयकॉन यातून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळा आयाम दिला. त्यांच्या डोळ्यांत नेहमी एक चमक असायची, जी त्यांच्या लोकप्रियतेइतकीच नम्र आणि मनमिळावू होती.
या महान कलाकाराचा एक आणखी सुंदर ठसा रेवदंड्यातही आहे. बरीच वर्षांपूर्वी त्यांच्या वतन के रखवाले या चित्रपटाचं शूटिंग रेवदंड्याच्या थेरोंडा फाटा जवळील वाडीत झालं होतं. त्या दिवसांत रेवदंडा गावात एक वेगळीच उत्सुकता होती. लोक त्या उंच, देखण्या, हसतमुख धर्मेंद्रकडे पाहत राहायचे. शॉटच्या मधल्या वेळेत ते स्थानिकांशी मोकळेपणाने गप्पा मारायचे. तर कुठे मुलांना कौतुक अशी त्यांची व्यवहारातील सहजता लोकांच्या मनात कायमची घर करून गेली. रेवदंड्याच्या मातीवर समुद्राच्या वाऱ्यांत उभा असलेला धर्मेंद्र आजही लोकांच्या आठवणीत जिवंत आहे आणि त्यामुळेच ते केवळ बॉलिवूडचे नव्हे तर कोकणाच्या भावविश्वातीलही नायक ठरतात.
काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळत होती. रुग्णालयात उपचारानंतर त्यांना घरी हलवण्यात आलं, पण नव्वद वर्षांच्या या आयुष्ययात्रेचा शेवट जवळ आला होता. अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. अंत्यसंस्काराच्या वेळी हेमा मालिनी हात जोडून उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर प्रेम, वेदना आणि कृतज्ञता एकत्र दाटून आलेली दिसत होती. हा नजारा मन पिळवटून टाकणारा होता. आयुष्यभराच्या साथीदाराला त्यांनी शांत पण गहिरं अभिवादन दिलं.

धर्मेंद्रचे जाणे म्हणजे एक संपूर्ण पर्व संपणे. आजचे कलाकार स्टार असतील, पण धर्मेंद्र हे स्टारडमचा इतिहास होते. त्यांचा संघर्ष, त्यांचं प्रेम, त्यांचा स्वभाव आणि त्यांची जीवनकहाणी हजारो चाहत्यांच्या मनात आजही धडधडत आहे. आणि म्हणूनच धर्मेंद्र कधीच संपणार नाहीत. ते पडद्यावर आणि आठवणीत नेहमीच जिवंत राहतील.
![]()

