छावा विशेष – भामट्या- भामटा – रस्त्याचा प्रवासी, मनाचा साक्षीदार

छावा विशेष – भामट्या
दि. १८ आगस्ट २०२५
भामटा – रस्त्याचा प्रवासी, मनाचा साक्षीदार
मी आहे भामटा रस्त्याने चालणारा जगाचा चेहरा पाहणारा आणि मनातल्या जखमा वाचणारा आज पुन्हा एका झोपडीपाशी थबकलो अंगावर फाटकी कमीज अंगातल्या हाडांना चिकटलेली त्वचा आणि डोळ्यांत उपाशीपणाची राख पाहून माझं मन हादरलं ते लेकरू काही बोललं नाही पण हजारो प्रश्न विचारून गेलं
छापा टाकणाऱ्यांनो एकदा तरी गरीबांच्या घरावर छापा टाका तिथे सोनं चांदी नाही मिळणार पण मिळेल रिकामी भांडी उपाशी पोट उपासमारीने कोरडी झालेली चूल पोटाची आग दाबून मुलांना अन्न घालणारी आई पोट रिकामं ठेवून जगाशी लढणारा बाप मिळेल पावसात गळणारं घर छपरातून टपकणारे थेंब अंगणभर पसरलेली चिखलाची दुर्गंधी आणि त्या सगळ्यातही ओलेचिंब स्वप्नं
श्रीमंतांच्या बंगल्यात तुम्हाला तिजोरी उघडताना काळा पैसा सापडतो पण या गरीबांच्या घरात तुम्हाला तिजोरी नाही सापडणार फक्त एक फाटकी पेटी सापडेल त्यात ठेवलेली शाळेची वही तुटका पेन्सिलचा तुकडा किंवा एखादी शिळी भाकर पण त्या पेटीत दडलेली आहे खरी संपत्ती त्यागाची सहनशक्तीची आणि जगण्यासाठीच्या संघर्षाची
गरिबांचा त्याग लपवलेला नसतो तो उघडपणे दिसतो गरिबांची भूक झाकलेली नसते ती थेट डोळ्यांत दिसते गरिबांची सहनशक्ती मोजली जात नाही ती पिढ्यानपिढ्या जगली जाते
छापा टाकणाऱ्यांनो एकदा तरी या घरावर छापा टाका तेव्हा कळेल की पैशाने नव्हे तर त्यागाने भुकेशी झगडून आणि स्वप्नांना धरून ठेवून हा देश टिकून आहे
मीपुढे निघालो पण त्या लेकराचे ओले डोळे अजूनही माझ्या मनातले पाऊस थांबू देत नाहीत