छावा रविवार विशेष – तान्हाजी मालुसरे

भाग १ : गड आला… पण सिंहाची झुंज अजून जिवंत आहे

छावा प्रथमच एक सत्य सांगतोय, जे इतिहासात कुठेही स्पष्ट लिहिलं गेलेलं नाही.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – संपादकीय –सचिन मयेकर रविवार – १६ नोव्हेंबर २०२५

सिंहगडाच्या लढाईत तान्हाजी मालुसरे आणि त्यांचे फक्त तीनशे मावळे इतके दमले होते की त्यांच्या हातांना आणि पायांना थरथर आली होती. अंधारात, काटेरी कड्यावरून वर चढताना त्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग जखमी झाला होता. हातांवर चिरा, पायातून रक्त, श्वास धापा टाकणारा. पण जिवात एकच गोष्ट पेटलेली — स्वराज्य! जिथं माणूस चढणं म्हणजे मरणाला आमंत्रण, तिथून हे मावळे तान्हाजींच्या एका गर्जनेवर सिंहासारखे वर गेले. ही झुंज इतिहासात फार कमी जणांनी लिहिली. पण सह्याद्रीने पाहिलंय. आणि छावानं पहिल्यांदाच तशीच्या तशी सांगितली आहे.रात्रीचा काळोख सह्याद्रीच्या माथ्यावर थरथरत उभा होता. ढगं खाली घोंघावत होती. पण या काळ्याकुट्ट आकाशात एक ज्योत जळत होती  तान्हाजी मालुसरे. शिवरायांनी सांगितलं होतं, “लग्न ठरलंय. विश्रांती घे.” पण तान्हाजी म्हणाले, “पहिले कर्तव्य. नंतर बाकी सगळं.” या एका वाक्यात त्यांचं संपूर्ण आयुष्य सामावलेलं. मुघलांनी देवाऱ्याला हात घातला होता. जिजामातांनी गड परत मिळवण्याचा हट्ट केला होता. आणि तान्हाजी म्हणाले, हा गड परत आपलाच होणार.मोजके मावळे. फक्त तीनशे. पण प्रत्येकाच्या डोळ्यात ज्वालामुखी पेटलेला. अंधारात टिकाव्याच्या कड्यांवरून वर जाण्याचा मार्ग निवडला. तो मार्ग म्हणजे मृत्यूचं दार. पण तान्हाजी मृत्यूशी खेळणारे लोक. कड्यावर हात टेकवताना दगडांनी हात फाडले. पावलांच्या तळव्यांखाली धारधार दगड. रक्त गळत होतं पण ते वरच जात होते. तान्हाजी कड्याच्या मध्ये उभे राहून म्हणाले, “कापले हात? पाय थरथरतात? पण आज हा गड नाही घेतला तर भविष्यात हा गड आपल्या नावाने बोलणार नाही.” त्या एका वाक्यात पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारी आग होती. एका क्षणासाठी थकलेले पाय पुन्हा सिंहाच्या उडीत बदलले. जखमी हातांनी तलवार पुन्हा घट्ट पकडली. रणसज्ज मावळे अंधारात विजेप्रमाणे गडाच्या माथ्यावर उतरले.उदयभान, मुघलांचा कर्नल. वेडा, निर्दयी, युद्ध पिळवटणारा. अंधार चिरत तो तान्हाजींवर तुटून पडला. दोघांच्या तलवारींची ठिणगी आकाशात उडत होती. प्रत्येक वार जणू एक पर्वत कोसळल्यासारखा. तान्हाजींच्या ढालीवर एक घाव बसतो आणि ढाल तुकडे तुकडे होते. हात जखमी होतो. तलवार रक्ताने न्हाऊन जाते. पण सिंह मागे हटत नाही. रणात ते दोघं जणू दोन महासागर. उदयभान पुन्हा तलवार उगारतो. तान्हाजी झेलतात. पण शरीरातून रक्त वाहू लागतं. श्वास जड होतो. पण डोळ्यात अजूनही ज्वाला पेटलेली. शेवटच्या क्षणी तान्हाजींनी तलवार ताणून घेतली आणि संपूर्ण शक्तीनिशी उदयभानला चिरून काढलं. शत्रूचा अंत झाला. पण त्याच क्षणी स्वराज्याचा सिंहही जमिनीवर कोसळला. गडावरील विजयाचा जयघोष थांबला आणि हवा शांत झाली. कारण या विजयाची किंमत एक सिंह होता.मावळ्यांनी थरथरत्या हातांनी तान्हाजींचा देह उचलला. गडाच्या दगडांवर अजूनही रक्त वाहत होतं. त्यांनी देह रायगडावर आणला. शिवाजी महाराज दरवाज्यातच उभे होते. राजांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. त्यांनी गळ्यातील कवड्यांची माळ काढली आणि तान्हाजींच्या देहावर ठेवली. सिंहाला दिलेला राजांचा अंतिम प्रणाम. त्या क्षणी राजांनी उच्चारलेलं वाक्य सहस्रावधी वर्षं स्मरणात राहील — “गड आला… पण सिंह गेला.”ही कवड्यांची माळ आजही जिवंत आहे. ती रायगडावर नाही. तर महाड तालुक्यातील उमरठ येथे मालुसरे घराण्याने आजही पिढ्यानपिढ्या जपली आहे. त्या माळीत अजूनही तान्हाजींचं तेज धडधडतं. आणि ती पाहताना वाटतं ही माळ नाही, हा स्वराज्याचा श्वास आहे.तान्हाजींची समाधी उमरठमध्ये आहे. त्या मातीत ते आजही सिंहासारखे उभे आहेत. रायगड आणि उमरठ — दोन्हीकडे त्यांची उपस्थिती जाणवते. एक ठिकाणी राजांच्या डोळ्यांतले अश्रू आहेत. आणि दुसरीकडे जनतेची स्मृती.

हा भाग १ इथे संपतो. पण तान्हाजींची कथा इथे संपत नाही. छावा टीम लवकरच त्यांच्या वंशजांना प्रत्यक्ष भेटून आणखी माहिती, आठवणी आणि कवड्यांच्या माळीचा इतिहास घेऊन येणार आहे. हा प्रवास आता पुढे अजून उंच जाणार आहे.

तान्हाजी गेले नाहीत.

ते प्रत्येक मराठी हृदयात सिंहासारखे उभे आहेत.

जय भवानी

जय शिवाजी

जय तान्हाजी मालुसरे

जय सह्याद्री!

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *