छावा रविवार प्रेरणा विशेष—एका बल्बपासून पेटलेली उजेडाची अमर कहाणी – भावोजी विजय कोळी

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर—रविवार 30 नोव्हेंबर २०२५

हा लेख विजय कोळी यांच्या कुटुंबाच्या संमतीने  प्रकाशित करण्यात येत आहे.”

मुंबईच्या गल्लीबोळात जन्मलेला, गरिबीत वाढलेला पण मनानं सोन्यासारखा उजळ असा एक माणूस म्हणजे भावोजी विजय कोळी. बालपणात खायला नसलेले दिवस, अंधारलेल्या रात्री आणि उद्याची चिंता, हीच त्याची पहिली शाळा. पण तो जिद्दीचा होता. त्याच्या डोळ्यात नेहमी एकच ज्वाला होती – काहीतरी करून दाखवायचं. मजुरी करत करत त्याने मुंबईत इलेक्ट्रिक काम शिकले. हाताला कला आली, कामात अचूकता आली, आणि मनात माणुसकी वाढत गेली. म्हणूनच लोकांनी त्याला नाव दिलं – कामाचा बॉस आणि मनाचा भावोजी. गावातला प्रत्येकजण त्याला याच नावानं हाक मारायचा.
त्याच्या आयुष्यात प्रेमानेही सुंदर प्रवेश केला. रेवदंड्यातील कोळीवाड्यातील शांत, साधी आणि प्रेमळ शुभांगीशी त्याची भेट मुंबईत झाली. परिस्थितीनं तिला घरकामाला आणलं होतं. ओळख वाढली, मनं जुळली आणि त्यांनी साधेपणानं लग्न केलं. नंतर दोघं रेवदंडा गावात स्थायिक झाले. समुद्राचा आवाज, गावाची माती आणि संसाराची ऊब – यांनी त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा दिली.
गावात स्थायिक झाल्यानंतर भावोजींचा स्वभाव सगळ्यांना कळू लागला. ते तापट होते. पण त्यांच्या तापामागे सोन्यासारखं हृदय दडलं होतं. त्यांना खोटं, आळस आणि बेजबाबदारपणा सहन होत नव्हता. पण ज्याच्याशी ते मनाने जुळले त्याच्यासाठी ते प्राणही पणाला लावत. गावात आजही म्हणतात – कामाचा बॉस, स्वभावाचा भावोजी आणि माणुसकीचा देव.
एकदा रेवदंड्यातील एका घरात बल्ब बंद पडला होता. काही केलं तरी तो पेटत नव्हता. घरच्यांनी भावोजींना बोलावलं. ते हसतमुख घरात आले. घरात ताण, चिंता, आणि निराशा. त्यांनी हसतच विचारलं, काय रे झालं. घरातील व्यक्ती म्हणाली, भावोजी बल्ब पेटत नाही. ते लगेच म्हणाले, चालू बघूया काय झालंय त्याला, आधी पाहू कोण बंद करून गेला. या एका वाक्यानं घरातलं वातावरण हलकं झालं. त्यांच्या हसण्यातून लोकांच्या मनातही प्रकाश पसरत असे. ते नेहमी म्हणायचे – आयुष्य पेटवायचं असतं, बल्ब नाही. आजही हे वाक्य अनेकांच्या मनात उजेड करून ठेवतं.
भावोजींच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रसंग म्हणजे वीजमंडळाचा मोठा संप. त्या काळात रेवदंडा गावातील बराचसा भाग अंधारात होता. अनेक घरांतील लाईट दिवसोंदिवस बंद. मुलांच्या अभ्यासावर परिणाम, घरातील कामं थांबलेली. लोक चिंतेत. कोण येणार, कोण दुरुस्त करणार, लाईट कधी येणार हे काहीच माहित नव्हतं.
तेव्हा गावात एकच माणूस पुढे आला – भावोजी विजय कोळी.
त्यांनी कोणाचा आदेश ऐकला नाही.
कोणाचे पैसे बघितले नाहीत.
कोणते नियम पाळले नाहीत.
फक्त एकच गोष्ट  गावाचं अंधारलेलं चेहऱ्यावरचं दु:ख.
ते सरळ पोलकडे धावले. वायरमध्ये प्रवाह असताना स्वतः जीवाची पर्वा न करता पोलवर चढले. हातातून ठिणग्या उडत होत्या, पण तुटलेल्या वायरी जोडल्या. फॉल्ट शोधून काढला, जळालेल्या कनेक्शनची अदलाबदल केली आणि काही वेळातच रेवदंडा गावातील मोठ्या भागात पुन्हा प्रकाश पेटला. सगळीकडून आवाज आला – भावोजी जिंदाबाद. त्या दिवशी गावाने त्यांना खरा योद्धा मानलं.
सगळ्यांसाठी धावणारा, मदत करणारा, उजेड देणारा हा भावोजी मात्र शेवटच्या काळात शांत होत गेला. प्रकृती ढासळत गेली. अशक्तपणा वाढला. आजारानं त्यांना जखडून टाकलं. आणि एक दिवस हा उजेडाचा माणूस स्वतः मात्र शांतपणे निघून गेला. आज त्यांना गेलं एक वर्ष झालं. पण रेवदंड्यात आजही एखादा बल्ब पेटला की लोक म्हणतात – हा भावोजीचा गुण होता. ते गेले नाहीत, ते फक्त आपल्या मनातल्या उजेडात राहायला गेले.
भावोजी गेल्यावर त्यांचं कुटुंबही संघर्षातून ताकदीने उभं राहिलं. त्यांचा मुलगा प्रतीक कोळी आज समजूतदार, कर्तृत्ववान आणि मेहनती तरुण म्हणून उभा आहे. वडिलांचा उजेड त्याच्या कामात आणि स्वभावात दिसतो. स्वतः भावोजींची पत्नी शुभांगी कोळी यांनीही संकटांवर मात करत आज मच्छी विकण्याचं धैर्याने काम सुरू केलं आहे. रोज बाजारात जाऊन कष्ट करून स्वतःच्या संसाराचा दिवा पेटवत आहेत. शुभांगीची बहीण सुनीता हिनेही संघर्षांना सामोरं जात स्वतः मच्छी विकत स्वतःचा संसार सांभाळला. तिसरी बहीण वैशाली, जी मुंबईत राहते, तीही प्रचंड मेहनती, जबाबदार आणि जगण्याचा कुतूहल राखून, प्रत्येक दिवस कष्टानं जगते. त्यांच्या या तिघींच्या जिद्दीमध्येच भावोजींचं शिक्षण आहे.
भावोजी विजय कोळी –नाव नाही.प्रकाश आहे.आणि प्रकाश कधीच विझत नाही.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *