छावा धमाका – अंजना ओम कश्यप यांच्या ‘फेक श्रद्धांजली’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल! धर्मेंद्र प्रकरणातील चुकीच्या बातमीवरून भडकली जनता

सोशल मीडियावर अफवांचा आणि फेक पोस्ट्सचा स्फोट सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांत न्यूज अँकर अंजना ओम कश्यप यांच्या फेक श्रद्धांजली फोटो, RIP मेसेजेस आणि एडिटेड फ्रेम्स मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसल्या. काहींनी तर माळांचे फोटो घालून खोटं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात मात्र — अंजना ओम कश्यप पूर्णपणे जिवंत आणि सुरक्षित आहेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या सर्व पोस्ट्स या बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल —सचिन मयेकर — शुक्रवार – १४ नोव्हेंबर २०२५

दरम्यान, काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल चुकीचे आणि अपूर्ण तपासणी केलेले अपडेट काही न्यूज प्लॅटफॉर्मवर दाखवले गेले होते. जबाबदार न्यूज चॅनेल्सने तपास न करता दाखवलेल्या अशा चुकीच्या अपडेट्समुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी निर्माण होणे साहजिकच आहे. धर्मेंद्र प्रकरणातील गोंधळानंतर जनतेमध्ये अस्वस्थता वाढली होती, आणि याच पार्श्वभूमीवर आता अंजना ओम कश्यप यांच्यावर सोशल मीडियात ट्रोलिंग वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

या नाराजीचे काहींनी चुकीच्या दिशेने रूपांतर केले. फेक श्रद्धांजली फोटो, एडिटेड फ्रेम्स आणि बनावट RIP पोस्ट्स टाकून एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्याचा प्रकार सुरू झाला. ही केवळ गैरजबाबदार कृती नाही, तर कायदेशीरदृष्ट्या गंभीर गुन्हा ठरू शकतो. जाणीवपूर्वक दिशाभूल करणे, अफवा पसरवणे आणि जनतेला गोंधळात टाकणे हे सोशल मीडियाच्या वापरातील अत्यंत धोकादायक ट्रेंडचे उदाहरण बनले आहे.

फॅक्ट–चेकनुसार अंजना ओम कश्यप यांच्या निधनाबद्दलची चर्चा पूर्णपणे खोटी आहे. कोणत्याही न्यूज चॅनेल, अधिकृत स्रोत किंवा विश्वसनीय माध्यमातून त्यांच्या मृत्यूची पुष्टी झालेली नाही. व्हायरल फोटो हे एडिटेड किंवा बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकशाहीत मतभेद, टीका आणि नाराजी असू शकते. पण चुकीच्या रिपोर्टिंगवरून किंवा एखाद्या वादातून एखाद्या व्यक्तीविरोधात फेक श्रद्धांजली मोहीम राबवणे हा अतिरेकच ठरतो. हे केवळ व्यक्तीला नव्हे तर संपूर्ण समाजातील माहितीप्रणालीलाच धक्का देणारे आहे.

या संपूर्ण घडामोडीत एक महत्त्वाची बाब म्हणजे – सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्याबद्दल अफवा, एडिटेड फोटो आणि चुकीची माहिती पसरत असताना ‘छावा’ने तपासून घेतलेली सत्य माहितीच प्रकाशित केली. कोणतीही अपुष्ट बातमी न देता, केवळ अधिकृत आणि खात्रीशीर स्रोतांवर आधारित तथ्ये वाचकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *