छापा… बनावट लेबलच्या आड दारूचा काळाबाजार! पोलादपूर तालुक्यात ६ लाखांचा गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त – एक अटकेत, दोन फरार.

दिनांक – ८ ऑगस्ट २०२५

 छावा – रायगड प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पोलादपूर तालुक्यातील दिविल गावात मोठी कारवाई करत तब्बल ६ लाख १५ हजार रुपयांच्या विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. गोवा बनावटीच्या बनावट लेबल व बुच लावून विक्रीसाठी ठेवलेली ही दारू एका बंद घरातून आढळून आली.

या कारवाईत रुपेश मोरे या आरोपीला अटक करण्यात आली असून, इतर दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी विभागाकडून सघन तपास सुरु आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, अधीक्षक रविकिरण कोल्हे, निरीक्षक सतीश गावडे, दुय्यम निरीक्षक रश्मीन समेळ व प्रसाद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने दिविल गावातील एका बंद घरावर छापा टाकला.

या ठिकाणी सापडलेली दारू गोवा बनावटीची असल्याचे दाखवत बनावट बुच व लेबल लावण्यात आले होते, ही बाब अधिक चिंताजनक आहे. या माध्यमातून अनधिकृतपणे विक्री करत गुन्हेगारी मोहोळ तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे.

छाप्यादरम्यान ५६ बॉक्स विदेशी दारू जप्त करण्यात आली असून, साठ्याची एकूण किंमत ₹६,१५,५६० एवढी असल्याची प्राथमिक माहिती आहे. बनावट लेबलच्या आधारे ती गोवा उत्पादन असल्याचा बनाव करण्यात आला होता.

या कारवाईतून गोवा राज्यातील मद्यावर बनावट लेबल व बुच लावून विक्रीचा मोठा रॅकेट कार्यरत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. ही दारू ग्राहकांपर्यंत पोहोचली असती, तर आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असता.

छावा सूचना

दारूची बनावट विक्री ही केवळ आर्थिक फसवणूक नसून समाजाच्या आरोग्याशी खेळ करणारा गंभीर गुन्हा आहे. या टोळीमागे आणखी कुणी आहे का, याचा तपास लवकरच उलगडेल अशी अपेक्षा आहे.

 तुम्ही ‘छावा’ न्युज पोर्टल वाचत आहात – जे सांगतं सत्य… थेट.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *