चौल-सोंडेपार गावात थरारक घरफोडी

बंद घर फोडून मौल्यवान भांड्यांची चोरी – संपूर्ण गाव हादरले, पोलिसांची करडी नजर संशयितांवर.
छावा – रेवदंडा,-सचिन मयेकर
चौल-सोंडेपार गावातील शांत वातावरणाला एका घरफोडीने धक्का बसला आहे. गावातील एका जुन्या, बंद घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत ऐतिहासिक आणि भावनिक दृष्ट्या मौल्यवान तांब्या–पितळेच्या भांड्यांवर डल्ला मारला.
फिर्यादी आरती अनंत काटवी यांच्या घरावर चोरट्यांची नजर होती. पाळत ठेवून योग्य क्षण साधत त्यांनी किचन रूमची लाकडी झडप सावधपणे उघडली. खिडकीवरील लोखंडी गज जबरदस्तीने वाकवून आत शिरले. त्यानंतर मागचा दरवाजा उघडून घराच्या आतील खोलीत शिरून मोठ्या आकाराची, मौल्यवान तांब्या–पितळेची भांडी हातोहात लंपास केली.
ही भांडी केवळ पैशांच्या दृष्टीने नव्हे तर कुटुंबाच्या इतिहासाशी आणि भावनांशी घट्ट जोडलेली होती. माल किती किमतीचा आहे हे महत्त्वाचं, पण त्यापेक्षा एक बंद घर फोडून चोरी झाली ही बाबच अधिक गंभीर आहे!
तक्रार मिळताच पोलीस उपनिरीक्षक म्हशेळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गावात संशयितांची झाडाझडती घेत असून, करडी नजर ठेवण्यात आली आहे. संशयास्पद हालचाली करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे आणि चौकशीसाठी काहींना पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून, लोकांमध्ये एकच चर्चा – बंद घरं सुरक्षित आहेत का?