चौल रामेश्वर मंदिराजवळील पुष्करणीमध्ये पावसाळी जलमहोत्सव; बालगोपाळ आणि तरुणाईचा उत्साह शिगेला

छावा –चौल| सचिन मयेकर |२९ जुलै २०२५
चौल येथील ऐतिहासिक श्री रामेश्वर मंदिराजवळील प्राचीन पुष्करणी (पाणवठा) यंदा वेळेपूर्वीच पाण्याने भरली असून, ती स्थानिकांसाठी जलक्रीडेचे केंद्र ठरली आहे. यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाल्याने, ही पुष्करणी लवकरच पाण्याने भरली आणि त्यामुळे दरवर्षीपेक्षा अधिक लवकरच पोहण्यासाठी सज्ज झाली होती.
सध्या परिसरातील बालगोपाळ आणि तरुणाई मनसोक्त जलक्रीडेचा आनंद घेत आहेत. काही लहान मुले प्लास्टिक ड्रम, रिकामे कॅन किंवा बाटल्यांचा वापर करून पोहण्याचा सराव करत आहेत. अनेक पालक आपल्या मुलांना पोहायला शिकवण्यासाठी त्यांच्यासोबत उपस्थित राहतात.
हे दृश्य एक आनंदोत्सवाचं स्वरूप घेते. बाल्य आणि तरुणाईचा उत्साह, पावसाच्या सानिध्यात प्रकट होताना पाहिल्यावर परिसरात उत्साही आणि उत्सवी वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक तरुण स्वखर्चातून परिसराची स्वच्छता राखत असून, हा परंपरेचा भाग म्हणून या जलोत्सवाकडे पाहिले जात आहे.
छावा मराठी न्यूज तर्फे सर्व रसिकांना या पावसाळी जलआनंदासाठी शुभेच्छा… आणि सर्वांनी सुरक्षिततेची काळजी घ्या ही विनंती.