चौलमधून उगम पावणारा लयताल… आठ वर्षाचा नर्तक विहान नाईक!

दिनांक : ६ ऑगस्ट २०२५
छावा –रेवदंडा – सचिन मयेकर
चौल हे केवळ ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव नाही, तर आजही इथे नव्या पिढ्यांचे नवे रंग उगम पावत आहेत. आणि त्याच रंगात रंगलेला एक नवा लयताल – तो म्हणजे फक्त आठ वर्षाचा, दुसरी इयत्तेत शिकणारा छोटा नर्तक विहान नाईक!
विहान हा चौल येथील मयेकर कुटुंबातील नातू आहे. म्हणजे विशेष म्हणजे त्याच्या कलाविष्कारामागे आहे त्याचा आजोबांचा हात. नुकतेच त्याला रेवदंडा समुद्रकिनारी नृत्याचा सराव करताना पाहण्याचा अनुभव मिळाला. पाठीमागे अथांग समुद्र, सभोवताली शांतता आणि त्यात तालबद्ध चाललेला विहानचा सराव – हे दृश्य केवळ सुंदरच नव्हे, तर प्रेरणादायकही होतं.
त्याच्या प्रत्येक स्टेपमागे आजोबांची बारकाईने नजर होती – प्रत्येक हालचालीमध्ये सुधारणा, प्रत्येक मूव्हमध्ये आत्मविश्वास.
सध्या विहान भोंनंग येथील एका डान्स क्लासमध्ये प्रशिक्षण घेत आहे, पण त्याचं खरं घडणं होतं आहे घरच्या आणि समुद्रकिनाऱ्याच्या खुल्या जागेत – जिथं आजोबा स्वतः त्याला मार्गदर्शन करतात.
आजच्या युगात जेव्हा अनेक लहान मुलं मोबाईल, टीव्ही, गेम्समध्ये हरवून जातात, तेव्हा विहान समुद्रकिनाऱ्यावर नृत्याच्या लयीने स्वतःला घडवत आहे – हीच खरी संस्कृतीची बीजं.
चौलमधून अशा नव्या पिढीचे कलाकार घडत असतील, तर हे गाव फक्त इतिहासापुरतं नाही, तर कलापुरतंही गौरवशाली ठरेल.
छोट्या विहानला ‘छावा’कडून मनःपूर्वक शुभेच्छा – तुझं पाऊल नृत्याच्या प्रत्येक पायरीवर यशाचं ठसे उमटवत राहो!