चिपळूणमध्ये अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश

गोपनीय माहितीनंतर धडक कारवाई
६५ वर्षीय इसम अटकेत ; १९ हजारांचा मुद्देमाल जप्त
छावा ; दि. ०८ जून | चिपळूण | प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्री व सेवनावर नियंत्रण ठेवण्याच्या मोहिमेला चिपळूण पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. शुक्रवारी, ६५ वर्षीय इसमाच्या ताब्यातून १९,६२० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या आदेशानुसार अमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ६ जून २०२५ रोजी, चिपळूण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. हर्षद हिंगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खेर्डी शिगवणवाडी येथील मुस्लिम मोहल्ल्यात एक इसम गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीनुसार, प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली तातडीने एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. संशयित इसम एका घरासमोर पिवळ्या रंगाची कापडी पिशवी घेऊन बसलेला दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपले नाव रुकनुद्दीन इब्राहीम बंदरकर (वय ६५, रा. मुस्लिम मोहल्ला, खेर्डी शिगवणवाडी, ता. चिपळूण) असे सांगितले.
त्यानंतर पंचनामा करून घेतलेल्या झडतीदरम्यान, त्याच्या पिशवीतून काळपट-हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व बिया असलेला एक गांजासदृश्य अमली पदार्थ आढळून आला. वजनात ३२७ ग्रॅम असलेल्या या पदार्थाची बाजारमूल्य अंदाजे १९,६२० रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. १३३/२०२५ अन्वये गुंगीकारक औषध व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मधील कलम ८(क), २०(ब) ii(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे, पो.उ.नि. हर्षद हिंगे, पो.हवा/११५१ वृषाल शेटकर, पो.हवा/६१७ संदीप मानके, पो.ना/१५३३ रोशन पवार, पो.थी/१३२२ कृष्णा दराडे, व पो.शी/१४४४ प्रमोद कदम यांनी सहभाग घेतला.