कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आंतरशालेय स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू; महाडमध्ये धक्कादायक घटना

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – महाड प्रतिनिधी — रविवार १४ डिसेंबर २०२५

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आंतरशालेय स्पर्धेसाठी अलिबाग तालुक्यातून महाड येथे आलेल्या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा कार्यक्रमादरम्यान अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी महाड येथे घडली. या घटनेमुळे विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांमध्ये शोककळा पसरली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मृत विद्यार्थिनीचे नाव निधी समीर म्हात्रे असे असून ती कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथील शाळेत नववीमध्ये शिक्षण घेत होती. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने यावर्षी विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन महाड येथे करण्यात आले होते. या स्पर्धांसाठी जिल्ह्यातील विविध शाळांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी महाड येथे दाखल झाले होते. १२ व १३ डिसेंबर या दोन दिवसांदरम्यान महाडमधील चांदे क्रीडांगणावर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.शहाबाज हायस्कूलची विद्यार्थिनी निधी म्हात्रे ही वक्तृत्व स्पर्धेसाठी महाड येथे आली होती. आज दुपारपासून स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुरू होता. याच समारंभादरम्यान बक्षीस स्वीकारून आपल्या जागेवर परत येत असताना निधीला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. उपस्थित शिक्षक व आयोजकांनी तिला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.निधीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तिचे पालक महाड येथे दाखल झाल्यानंतर मृतदेहाचे शिवविच्छेदन (पोस्टमार्टम) करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या आकस्मिक घटनेमुळे स्पर्धास्थळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र शोककळा पसरली असून पारितोषिक वितरण समारंभावरही दुःखाचे सावट पसरले होते.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *