कोकणातील बंदरविकासाच्या कामांना गती देण्याचे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचे निर्देश
• छावा • मुंबई, दि १० • प्रतिनिधी
कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा आणि ससून डॉक येथील बंदरांची विकासकामे गतीने आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. मंत्रालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
कोकणाच्या विकासासाठी ही बंदरे अत्यंत महत्त्वाची असून, या ठिकाणी चालू असलेल्या विकास प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या आर्थिक प्रगतीस चालना मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी समन्वय आणि वेळेवर काम पूर्ण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला विभागाचे आयुक्त किशोर तावडे, महाराष्ट्र मच्छीमार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक, उपसचिव श्री. जकाते, सह आयुक्त दिनेश देवरे, प्रादेशिक उपायुक्त प्रकाश भादुले, तसेच विभाग व महामंडळातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान मंत्री श्री. राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले. यावेळी मत्स्य व्यवसाय क्षेत्रात स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यावरही चर्चा झाली.