कोकणाच्या जलद विकासासाठी महामार्गांची उभारणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
छावा • माणगाव, दि. ९ जून | प्रतिनिधी
“नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या कोकणाच्या जलदगतीने विकासासाठी रस्ते आणि महामार्गांची उभारणी अत्यंत गरजेची असून, प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माणगाव येथे केले.
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई शाळेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच पूर्ण होईल. मुंबई-सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल महामार्गाचे काम देखील प्रगतीपथावर आहे. कोस्टल महामार्गावरील ९ खाडी पुलांचे काम सुरू करण्यात आले आहे.
माणगाव बायपास मार्ग लवकरच मार्गी लावण्यात येणार असून, या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे.
‘लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार
महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना कोणत्याही अडचणी आल्या तरी सुरूच राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
मुलींच्या शिक्षणासाठी समर्पित सीबीएसई शाळा
“मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे यांचे शिक्षणासाठी योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही शाळा सुरू करून ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी दिली आहे, ही बाब कौतुकास्पद आहे,” असेही त्यांनी सांगितले.
मराठीचा अभिमान जपत जागतिक स्पर्धेला तोंड द्यायचे असल्यास इंग्रजी शिक्षणाची गरज आहे, म्हणूनच ही सीबीएसई शाळा सुरू करण्यात आली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तर रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. खा. सुनील तटकरे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करताना सांगितले की, “संस्थेमुळे माणगावातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या असून, त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच संधी मिळते.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अॅड. राजीव साबळे यांनी केले. यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, पालक, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“कोकणातील तरुणांना स्थानिक स्तरावर रोजगार मिळावा यासाठी मोठ्या प्रकल्पांची गरज आहे. राज्य शासन लोकाभिमुख प्रकल्प राबवत असून, कोकणातही विकासाला चालना देणार,” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे