कुणी रस्ता देत का रस्ता? खड्ड्यांत हरवलंय जनतेचं आयुष्य!

रेवदंडा–अलिबाग मुख्य रस्ता तसेच बेलकडेपर्यंत व पुढे  नागाव बायपास या मार्गांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, रस्त्यात रस्ता दिसेनासा झाला असून केवळ खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ता अक्षरशः अदृश्य झाल्याने अपघातप्रवण क्षेत्रात रूपांतर झाले आहे.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर रेवदंडा—सोमवार — २९ सप्टेंबर २०२५

कालच या रस्त्यावरून दुचाकीवर जाणारी एक मुलगी खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने घसरून पडली. मागून वाहन येत असतानाही प्रसंगावधानाने तिचे प्राण वाचले. स्थानिक नागरिकांनी तिला उचलून धीर दिला, मात्र तिला दुखापत झाली. अशा घटना आता रोजच्याच झाल्या आहेत.

या रस्त्यावरून ये-जा करताना लोकांना अक्षरशः आट्यापाट्या खेळावा तसं वाहन चालवावं लागतंय. खड्ड्यांतून बाहेर येताना जणू चंद्रावर गेल्याचा अनुभव प्रवाशांना मिळतोय. पण फरक एवढाच की — चंद्रावर खड्ड्यात आपटले तर माणूस उंच उडून अलगद खाली पडेल; इथे मात्र खड्ड्यात आपटल्यावर उंच उडून चारपटीने जोरात जमिनीवर आपटून दणका बसतो!

वाहनचालकांना धोक्याचा खेळ करीत प्रवास करावा लागत आहे. दोनचाकीस्वारांचा तोल जाईल इतके खोल खड्डे, वाहनांचे नुकसान, प्रवाशांचे प्राण धोक्यात… या सर्वामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांचा थेट सवाल आहे – एवढ्या महत्त्वाच्या मार्गांची एवढी दुर्दशा का? लोकप्रतिनिधी सुद्धा गप्प का? गोरगरीब जनतेचा खरा वाली कोण? आता नाना पाटेकरांच्या चित्रपटातील संवादासारखाच प्रश्न लोक विचारत आहेत – ते आहे ना “कुणी घर देत का घर?” तसेच कुणी रस्ता देत का रस्ता?”

ग्रामस्थांचे स्पष्ट मत आहे की, जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेळेवर लक्ष दिले नाही तर उद्या मोठ्या दुर्घटनेची जबाबदारी त्यांनाच घ्यावी लागेल.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *