संपादकीय – किल्ल्यांवर कोरू नका नाव, मनात कोरा शिवरायांचा गौरव

छावा, संपादकीय | दि. ०७ जुलै(सचिन मयेकर)
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक युगपुरुष नव्हते, तर मूल्यांची उंची सांगणारा एक आदर्श होते. त्यांनी असंख्य किल्ले बांधले,
शत्रूंपासून जिंकले आणि ते व्यवस्थित सांभाळले. पण या साऱ्या पराक्रमात एक बाब प्रकर्षाने दिसून येते त्यांनी कधीही स्वतःचे नाव कोणत्याही किल्ल्याला दिले नाही. हेच त्यांच्या विनयशीलतेचं, कार्यमूल्यांचं आणि लोकहितदृष्टीचं सर्वोत्तम उदाहरण ठरतं.
राजगड, प्रतापगड, शिवनेरी ,सिंहगड, रायगड या प्रत्येक नावामागे एक ऐतिहासिक महत्त्व आणि स्वराज्याचा ध्यास आहे. हे किल्ले शिवरायांच्या दूरदृष्टीचे, प्रशासनकौशल्याचे आणि युद्धनीतीचे जिवंत स्मारक आहेत. त्यांनी या किल्ल्यांमध्ये न्यायव्यवस्था, शस्त्रसज्जता, राजकारभार यांचं अचूक नियोजन केलं. ते किल्ले हे त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचे नव्हते, तर स्वराज्य रक्षणाचे बुरुज होते.
आज, हेच किल्ले आपण अभिमानाने पाहतो, पण त्याच भिंतींवर काही जण स्वतःची नावे कोरून शिवरायांच्या वारशाची विटंबना करत आहेत. भिंती रंगवणं, दगडांवर नावं लिहणं किंवा प्रेमकहाण्या कोरणं हे प्रकार केवळ लाजिरवाणेच नव्हे, तर इतिहासद्रोह आहेत.
शिवरायांना खरोखर अभिवादन करायचं असेल, तर त्यांच्या किल्ल्यांना पवित्र स्थळाप्रमाणे वागणूक द्या. त्यांचं स्मरण आपल्या मनात ठेवा भिंतींवर नव्हे. कारण खरी अभिवादनाची भावना ही जपवलेली जाते, कोरलेली नाही.
किल्ल्यांवर जाणं हे पर्यटन नसून एक यात्रा आहे, श्रद्धा आहे. तिथे आपलं नव्हे, त्यांचं नाव उजळावं हीच खरी भक्ती आणि इतिहासप्रेम आहे.