दहिसर दही हंडी दुर्घटना – आयोजक अध्यक्ष बाळू सुर्नारवर गुन्हा दाखल!

दहिसर दही हंडी दुर्घटना – आयोजक अध्यक्ष बाळू सुर्नारवर गुन्हा दाखल!
११ वर्षीय गविंदा महेश रमेश जाधवच्या मृत्यूच्या प्रकरणात दहिसर पोलिसांनी नवतरूण मित्र मंडळ पथकाचे अध्यक्ष बाळू सुर्नार यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०६ (दुर्लक्षामुळे मृत्यू) आणि कलम २३३ (सरकारी आदेश पाळण्यात नाकामी) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षा साधनांचा पूर्ण अभाव आणि नियमांची पायमल्ली हा बेजबाबदारपणा थेट एका चिमुकल्याचा जीव घेणारा ठरला!
दिनांक : १२ ऑगस्ट २०२५
छावा –रेवदंडा – सचिन मयेकर
रविवार रात्री दहिसर (पूर्व) – केतकीपाडा…
दही हांडीच्या सरावासाठी गविंदांची उंच पिरॅमिड रचली जात होती. लोकांचा जल्लोष, मुलांचा उत्साह, ढोल-ताशांचा आवाज… आणि त्याच गोंगाटात एका घराचा दिवा कायमचा विझला.
११ वर्षीय महेश रमेश जाधव एक खेळकर, अभ्यासू, आणि उत्साही चिमुकला गविंदा. सहाव्या थरावरून हसत-हसत चढला, पण क्षणात तोल गेला… तो थेट खाली कोसळला. डोक्यावर गंभीर मार…
रुग्णालय गाठण्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आणि तिथून सुरू झाला एका कुटुंबाचा अंतहीन अंधार.
दुर्लक्षाचा खेळ – कायदेशीर थरकाप
पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षावर भारतीय दंड संहिता कलम ३०४(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे दुर्लक्षामुळे मृत्यू.
सुरक्षा उपायांचा फज्जा हेल्मेट नाही, सेफ्टी बेल्ट नाही, जाळी नाही… फक्त उंच थरावर चढवलेला ११ वर्षांचा मुलगा.ही उत्सवाची शान की जीवाशी खेळ?
उत्सवाच्या नावाखाली जीवघेणा थाट
दरवर्षी दही हंडीच्या सरावावेळी जखमा होतात, अपघात होतात, जीव जातात…
पण आयोजकांचे “हे तर नित्याचं” हे बेजबाबदार वाक्य बदलत नाही.
कुणाचं तरी मूल, कुणाचं तरी लेकरू, कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं – आणि काही दिवसांनी सगळं पुन्हा नेहमीसारखं सुरू होतं.
छाव्याची हाक
उत्सव हे आपल्या संस्कृतीचं सौंदर्य आहे – पण तो जीवाच्या किंमतीवर नाही.
आता वेळ आली आहे – प्रत्येक आयोजकाला सुरक्षा नियम पाळणे बंधनकारक करण्याची.
दोषींना कठोर शिक्षा द्या, अन्यथा उद्या आणखी एका महेशचा जीव जाईल… आणि आपण पुन्हा केवळ शोकसभा घेऊ!
छावा संपादकीय संदेश
हंडी फोडा – पण सुरक्षिततेच्या चौकटीतच. नाहीतर तीच हंडी घर उध्वस्त करणारी ठरेल.