आपत्ती काळात माध्यमांना सत्य व अचूक माहिती द्यावी
अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या प्रशासनाला सूचना
छावा • मुंबई | प्रतिनिधी
“आपत्तीच्या काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व सत्य माहिती पोहोचवणे ही अत्यंत गरजेची बाब असून, त्यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अधिक सजग राहून माध्यमांना सत्य घटनांची माहिती देण्याची जबाबदारी पार पाडावी,” असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केले.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे, तसेच विविध विभागांचे जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते
माहितीचा अचूक व वेळेवर प्रसार आवश्यक – अमृत नाटेकर
नैसर्गिक आपत्तींमध्ये अचूक पूर्वसूचना मिळत नसेल, अशा वेळी विभागीय यंत्रणांमध्ये समन्वय, तत्काळ प्रतिसाद व योग्य माहिती प्रसार ही अत्यावश्यक सूत्रे ठरतात, असे नाटेकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी सूचना दिल्या की, जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माहिती खातरजमा करूनच माध्यमांना द्यावी आणि सकारात्मक संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा.
संवेदनशीलता आणि संवादावर भर – हेमराज बागुल
संचालक (प्रशासन) हेमराज बागुल यांनी अधोरेखित केले की, “आपत्ती काळात समन्वय, संवाद आणि संवेदनशीलता या त्रिसूत्रीवर जनसंपर्क अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करावे.” चुकीच्या माहितीमुळे निर्माण होणाऱ्या अफवांमुळे शासनाची प्रतिमा मलीन होऊ शकते, हे टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अफवांचे खंडन आणि तत्काळ माहिती देणे गरजेचे – डॉ. गणेश मुळे
संचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांनी आपत्ती काळातील अफवांचे तातडीने खंडन करणे, आणि स्थानिक तसेच राष्ट्रीय यंत्रणांकडून मिळणारी वस्तुनिष्ठ माहिती समाजमाध्यमे, वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि रेडिओच्या माध्यमातून वेळेत पोहोचवणे, ही जनसंपर्क अधिकाऱ्यांची प्रमुख जबाबदारी असल्याचे सांगितले.
तसेच, प्रत्येक विभागाने स्वतःचा समन्वय व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यामार्फत तात्काळ माहितीचा आदान-प्रदान करावा, असेही त्यांनी सुचवले.
बैठकीत विविध सूचना व उपाय योजनांवर चर्चा
या बैठकीत उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त अजय साबळे, मुंबई दूरदर्शनच्या उपसंचालक संगीता गोडबोले, ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, आकाशवाणीचे सहायक संचालक डॉ. संतोष जाधव, सहायक संचालक (माहिती) इर्शाद बागवान आदींनी आपापल्या क्षेत्रातील अनुभव व उपाय योजना मांडल्या.
संपर्कसाधनांचा अद्ययावत संच, माहिती पुस्तिका व हेल्पलाइन क्रमांक यांचा उपयोग करून जनतेला योग्य मार्गदर्शन देणे हे जनसंपर्क अधिकाऱ्यांचे मुख्य कर्तव्य असल्याचा पुनरुच्चार या बैठकीत करण्यात आला.