रविवार विशेष आगरकोट किल्ला – रेवदंड्याच्या आठवणींत दडलेला एक भव्य पोर्तुगीज दुर्ग
रविवार विशेष
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मधुकर मयेकर – रविवार ०७ डिसेंबर २०२५
रेवदंडा हे अरबी समुद्राच्या कुशीत वसलेले ऐतिहासिक बंदर असून, येथील लोकस्मृतीत आजही जिवंत असणाऱ्या आगरकोट किल्ल्याचा इतिहास अत्यंत रोमहर्षक आहे. सध्या भग्न अवस्थेत असलेल्या या किल्ल्याने एक काळ पोर्तुगीजांच्या सामर्थ्याचे पहिले उत्तरेकडील लष्करी ठाणे म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. इसवीसन १६३४ मध्ये पोर्तुगीज इतिहासकार अंतोनिओ बोकारो यांनी लिहून ठेवलेल्या माहितीप्रमाणे येथे दोनशे पोर्तुगीज आणि पन्नास स्थानिक ख्रिस्ती लोकांची घरे होती, आणि प्रत्येक घरात काम करण्यासाठी एक गुलाम नियुक्त केलेला असे. किल्ल्यात दोन शस्त्रागारे, तसेच भव्य कॅथेड्रल, रुग्णालय, जेझुइट चर्च, ऑगस्टीनियन चर्च, सेंट सॅबेस्टियन चर्च, सेंट जॉन पॅरिश चर्च अशा अनेक मोठ्या धार्मिक व प्रशासकीय इमारती होत्या, तर या सर्व बांधकामांच्या देखभालीसाठी वार्षिक २४४८ रुपयांची तरतूद केली जात असे अशी नोंद पोर्तुगीज कागदपत्रांत सापडते.

सोळाव्या शतकापासून येथे पोर्तुगीजांनी एक अत्यंत महत्त्वाचे व्यापारी बंदर आणि लष्करी केंद्र उभे केले होते. चीन, पर्शियन आखात, लाल समुद्र अशा आंतरराष्ट्रीय व्यापारमार्गांशी चौल-रेवदंडा बंदराचे मजबूत संबंध होते, आणि रेशीम, मलमल, कापसाचे कापड, लाकडी वस्तू यांच्या निर्यात-आयातीमुळे या प्रदेशात मोठी आर्थिक समृद्धी होती. १६२५ ते १६३४ या कालावधीत किल्ल्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आला. १६३५ साली उत्तरेकडील तर १६३८ साली दक्षिणेकडील दरवाज्याची डागडुजी झाली आणि १६५६ पर्यंत हे नवे बांधकाम पूर्णत्वाला पोहोचले. पोर्तुगीजांनी या दुर्गाचे नामकरण “साओ पेद्रो ए साओ पाऊलो दे चौल” असे केले होते. जमिनीकडील प्रवेशद्वाराला “पोर्टा डे टेरा” असे नाव देण्यात आले होते आणि त्याच्या सुरक्षेसाठी खंदक खणण्यात आला होता, तर समुद्रामार्गे उघडणाऱ्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला “पोर्टा डॉ मार” असे संबोधले जायचे. या दरवाजांवरची पोर्तुगीज राजचिन्हे आजही काही ठिकाणी स्पष्ट दिसतात.

मॅट्रिझ चर्चचे बांधकाम १५३४ मध्ये सुरू झाले होते आणि येथे “नोसा सेन्योरा डो मार” म्हणजेच “अवर लेडी ऑफ द सी” या रूपात मेरीची उपासना केली जात असे. बोकारोच्या लिखाणात किल्ल्याला १५ बाजू, ११ बुरुज आणि ५८ तोफा असल्याचा उल्लेख आहे. नदीकडील बुरुजावर १८ पौंडी कॅमल तोफ, काही बुरुजांवर ६५ पौंडी लोखंडी गोळे फेकणाऱ्या तोफा, पाचव्या बुरुजावर १६ पौंडी पितळी तोफ, सहाव्यावर १४ पौंडी दगडी-लोखंडी गोळे फेकणारी तोफ, तर सातव्या बुरुजावर तब्बल ४० पौंडी क्षमतेच्या दोन ‘ईगल’ तोफा होत्या, तसेच नवव्या बुरुजावर २४ पौंडी लोखंडी तोफ तैनात होती. सातखणी बुरुजाजवळ आजही काही तोफांचे तुकडे गवतामधून डोकावताना दिसतात आणि ते त्या काळातील युद्धतयारीची साक्ष देतात. जमिनीकडील प्रवेशद्वाराजवळ सापडलेला शिलालेख आता मुंबईच्या संग्रहालयात असून, किल्ल्याचा कप्तान जोआओ दे थोबार वॅलेस्को यांनी १६३५-३६ मध्ये किल्ल्याची दुरुस्ती करून त्याला अधिक भक्कम केल्याची त्यात नोंद आहे.

आज डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हा किल्ला पसरलेला दिसतो आणि त्याचा तट फोडूनच आधुनिक मार्ग तयार करण्यात आल्यामुळे मूळ रचना खूपशी नष्ट झालेली आहे. तरीही भग्न भिंती, अवशेषांमधून दिसणाऱ्या कमानी, कोसळलेल्या तटबंद्या आणि मंदिरे यांचे अस्तित्व हे स्पष्ट सांगते की येथे एके काळी अतिशय संपन्न आणि सामरिकदृष्ट्या प्रभावी असा दुर्ग उभा होता.
इतिहासाचा काळोख पुसून आज या किल्ल्याची मूळ ओळख परत जगासमोर आणणे अत्यावश्यक आहे, कारण रेवदंड्याचा आगरकोट हा केवळ पडझड झालेला बांधकाम अवशेष नसून, व्यापार, युद्ध, धर्म आणि संस्कृती यांच्या संगमातून घडलेले एक जिवंत आणि अजोड ऐतिहासिक सत्य आहे. या परिसराचा अभ्यास, संवर्धन आणि दस्तऐवजीकरण झाले तर हा किल्ला पुन्हा एकदा कोकणाच्या नकाशावर मानाने उभा राहील आणि भविष्यातील पिढ्यांना आपल्या भव्य इतिहासाची आठवण करून देत राहील.
![]()

