आई-वडिलांच्या छायेत वाढलेला राजा!- छावा

छावा – भाग २
छावा मराठी विशेष लेखमाला
लेखक – सचिन मयेकर, छावा मराठी
प्रस्तावना
ज्याचं आयुष्य रणात गेलं,
त्याचं बालपण मात्र आठवणींच्या वासरात हरवलेलं होतं…
छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य आपण सर्वजण जाणतो, पण त्या पराक्रमी राजाचं मन आईच्या मायेच्या शोधात आणि वडिलांच्या सावलीत घडत होतं, हे फार कमी जणांना माहीत आहे.
लहान संभाजी – आईसाहेबांच्या कुशीतून पाटीवर
१६५७ साली पुरंदर किल्ल्यावर जन्मलेल्या संभाजीराजांना आईसाहेब सईबाईंचं मायेचं बाळकडू फारच थोडं मिळालं.
फक्त दोन वर्षांचं वय असताना त्यांचं सईबाईंचं निधन झालं, आणि त्या वळणावर संभाजीराजांचा निरागसपणा अचानक पाटीवर, गुरूच्या चरणांशी आणि राजकारणाच्या गदारोळात फेकला गेला.
आई कुठे गेली?
लहान संभाजीराजे आपल्या सेविकांना विचारायचे,
आणि पाटीवर ‘श्री’ लिहून रडायचे.
राजमहालातलं बालपण – सभा आणि शिक्षण
शिवाजी महाराज जेव्हा राजसभा घेत असत,
तेव्हा लहान संभाजी गुपचूप त्यांच्या मांडीवर जाऊन बसायचे.
कधी कधी सभा मधेच थांबवत म्हणत,
बाबा, माझी तलवार कुठे ठेवली?
शिवराय थोडे हसत, आणि सगळ्या सरदारांमध्ये गूढ शांतता पसरायची.
म्हणत, हा बघा, उद्याचा राजा! शिस्त लावावी लागेल!
त्यांना लहानपणापासूनच संस्कृत श्लोक, युद्धशास्त्र, भूगोल आणि न्यायशास्त्र शिकवलं जात होतं.
पण त्यांच्या डोळ्यांत अधूनमधून आईच्या मायेचा शोध कायम दिसायचा.
शिवरायांची शिकवण – राजा व्हा पण माणूसही व्हा.
शिवाजी महाराज अनेकदा संभाजी राजांना अंगाखांद्यावर खेळवत असताना म्हणायचे:
राजे होणार तुम्ही… पण त्याआधी माणूस व्हा. माणूस.
जनतेचा राजा, आणि धर्माचा रक्षक!
हीच शिकवण त्यांच्या मनात खोलवर साठवली गेली.
एका रात्री शिवरायांनी संभाजीराजांना किल्ल्यावर नेत, आकाश दाखवून सांगितलं,
तो तारा बघ… तिकडे तुझी आई आहे…
आणि तू जेव्हा चांगलं करशील, ती तारा झगमगेल!
त्या रात्री संभाजीराजांनी पहिल्यांदा शब्दांशिवाय रडणं सोडलं… आणि शिकणं सुरू केलं.
लहान संभाजी – तलवारीतली आणि मनातली धडपड
खेळातसुद्धा ते कधी मुघलांचा राजा बनायचे नाहीत.
मी छत्रपतीच आहे असं म्हणून आपल्या लाकडी तलवारीने आपल्या वयाच्या दुप्पट वयाच्या मुलांना मात देत.
शिवाजी महाराजांना वाटायचं — हा मुलगा फक्त राजपुत्र नाही,
हा एक तेजस्वी वणवा आहे – जो एक दिवस गगनही जाळेल!
आईसाहेब सईबाईंची आठवण,
शिवरायांची शिकवण,
आणि राजमहालातलं निरागस हसू –
या साऱ्यांपासून घडत होता ‘छावा’ – धर्मवीर संभाजी महाराज!