अवकाळी ते अखंड पावसाचा विक्रमी लहरी हंगाम..

मेपासून सुरु, सप्टेंबरपर्यंत अखंड बरसतोय पाऊस
सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०८ सप्टेंबर २०२५
सह्याद्रीच्या कड्या-कपारीत, कोकणाच्या सागरी वाऱ्यांत आणि शहरांच्या गजबजाटात… या वर्षी पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही. नेहमीप्रमाणे जूनमध्ये हजेरी लावण्याऐवजी या वर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाने सुरुवात केली. विशेष म्हणजे, आज दिनांक ८ सप्टेंबर असूनही अनेक ठिकाणी मुसळधार सरी कोसळत आहेत.
कृषी क्षेत्रासाठी जरी हा पाऊस काही अंशी फायदेशीर ठरला असला, तरी शेतमालाची काढणी, रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि पूरस्थिती यामुळे नागरिकांचे हाल झाले. शाळा-कॉलेजांमध्ये सुट्ट्यांचा पाऊस, तर बाजारपेठांमध्ये मंदीचे सावट दिसले.
हवामान खात्याच्या मते, यंदाचा हंगाम सरासरीपेक्षा खूपच जास्त लांबला आहे. जून ते सप्टेंबर हा अधिकृत पावसाळा; पण मे ते सप्टेंबरपर्यंत चाललेला पाऊस हा असामान्य प्रकार आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
दरम्यान, नागरिकांमध्येही चर्चा रंगली आहे हा खरा पावसाळा की हवामानबदलाची चाहूल.