जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्वाळांचा तांडव; वेळीच कारवाईमुळे संकट टळले

  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍ सचिन मयेकर | अलिबाग 
  • 📅मंगळवार | १७ फेब्रुवारी २०२६

अलिबाग शहरातील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गजबजलेल्या परिसरात सोमवारी (दि. १६) सायंकाळच्या सुमारास अचानक धुराचे लोट उठले आणि काही क्षणांतच ‘स्वामी छाया’ हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीने क्षणभर परिसरात भीतीचे सावट पसरले. कार्यालये सुटण्याची वेळ आणि बाजारपेठेची गर्दी  अशा वेळी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलमधील विद्युत यंत्रणेत बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाले आणि त्यातून ठिणगी पडून आग लागली. काही क्षणांतच फर्निचर, काउंटर, आतील साहित्य यांना ज्वाळांनी वेढले. धुराचे दाट ढग बाहेर येऊ लागल्याने नागरिकांनी सुरक्षित अंतर राखत मदतीसाठी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हॉटेल कर्मचाऱ्यांनी तात्काळ बाहेर पडत अग्निशमन दलाला कळविले.

अलिबाग नगरपरिषद अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होताच त्यांनी वेगाने पाण्याचा मारा सुरू केला. धुराच्या ढगात आणि उष्णतेच्या झळांत जवानांनी जीवाची पर्वा न करता आत प्रवेश केला. हॉटेलमध्ये ठेवलेले गॅस सिलिंडर आणि अन्य ज्वलनशील साहित्य तातडीने बाहेर काढण्यात आले  आणि इथेच खरा मोठा धोका टळला!

कारण जर आगीचा भडका वाढून गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असता, तर संपूर्ण परिसर हादरला असता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हा दाटीवाटीचा भाग; आजूबाजूला दुकाने, कार्यालये, नागरिकांची वर्दळ  अशा परिस्थितीत स्फोट झाला असता तर जीवितहानी अटळ ठरली असती. साखळी स्वरूपात आग पसरून कोट्यवधींचे नुकसान झाले असते. काही क्षणांचा उशीर संपूर्ण बाजारपेठेसाठी घातक ठरला असता. पण जवानांच्या तत्परतेमुळे आणि धाडसी निर्णयामुळे संभाव्य महाभयंकर दुर्घटना टळली.

दरम्यान, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाढती गर्दी नियंत्रणात ठेवत पोलिसांनी संपूर्ण परिसर सुरक्षित केला. रात्री उशिरापर्यंत आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू होते.

अलिबाग नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आर्थिक नुकसान झाले असून, वेळीच दाखवलेल्या धैर्यामुळे आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला  अशीच चर्चा संपूर्ण अलिबागमध्ये रंगली आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *