अलिबाग–रोहा मार्गावर साकव कोसळला! ठेकेदारांचा भ्रष्ट कारभार आणि शासनाची निष्काळजीपणा उघडा — जनता पेटली, रस्ता थांबला
अलिबाग–रोहा मार्गावरील वढाव खानाव दरम्यानचा साकव सोमवारी (दि. ३) सायंकाळी सातच्या सुमारास कोसळला आणि क्षणभरात संपूर्ण मार्गावर अराजक पसरलं. दरीत पडलेला साकव, अंधारात थांबलेली वाहने आणि हादरलेले प्रवासी — हे दृश्य शासनाच्या निष्काळजीपणावर ठळक शिक्का मारणारं ठरलं आहे. या अपघातामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, पण हा अपघात प्रशासनाच्या गलथान कारभाराचा आणि ठेकेदारांच्या भ्रष्ट पद्धतीचा जिवंत पुरावा ठरला आहे.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर सोमवार –
०३ नोव्हेंबर २०२५
अपघाताच्या वेळी एक दुचाकीस्वार साकवावरून जात असताना काही क्षणातच पूल कोसळला, आणि तो थोडक्यात बचावला. दुसरा चालक किरकोळ जखमी झाला असून, दोघेही प्रसंगातून कसाबसा सुटले. मात्र, नागरिकांचा रोष उसळला आहे. “दरवर्षी फोटो काढतात, पाट्या लावतात, पण दुरुस्ती करत नाहीत. आता पूल कोसळल्यावरच जाग आली का?” असा सवाल नागरिकांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाला केला आहे.
पावसाळा संपूनही साकव दुरुस्तीचे काम सुरू न केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी होत आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन केवळ फोटोसेशन केलं, पण प्रत्यक्षात कोणतीही तातडीची कारवाई झालेली नाही. नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे — “जनतेचा जीव धोक्यात घालून शासन झोपलंय का?”
हा साकव फक्त कोसळलेला पूल नाही, तर शासनाच्या दुर्लक्षाचा, भ्रष्ट ठेकेदारांच्या संगनमताचा आणि निष्क्रिय प्रशासनाचा पुरावा आहे. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी रोज या मार्गाने प्रवास करतात. या साकवावरील कोसळलेला भाग त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. तरीही शासनाची हालचाल मंद आहे, आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही.
स्थानिक नागरिकांनी इशारा दिला आहे की, “जर जबाबदारांवर गुन्हा दाखल केला नाही, तर आम्हीच रस्ता अडवू. फोटोसेशन नाही, उत्तरं द्या!” प्रशासन मात्र नेहमीच्या स्टाईलमध्ये मौन बाळगून आहे.
छावा स्पष्ट सांगतो — हा अपघात नाही, हा शासन आणि ठेकेदारांच्या भ्रष्ट संगनमताचा गुन्हा आहे. जनतेचा संयम आता संपला आहे. ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांनी लक्षात ठेवावं — कोसळलेला पूल पुन्हा उभा राहील, पण जनतेचा विश्वास आता उभा राहणार नाही.
![]()

