अलिबाग – रेवदंडा हमरस्त्यावर मोकाट कुत्र्यांची दहशत

छावा- रेवदंडा -सचिन मयेकर- ७ ऑगस्ट २०२५
अलिबाग ते रेवदंडा हमरस्त्यावर रात्रीच्या वेळेस मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना हे कुत्रे अचानक रस्त्यावर धाव घेत पाठलाग करतात, काही वेळा गाडीसमोर येऊन थेट अपघाताची परिस्थिती निर्माण करतात.
यात काही दुचाकीस्वारांना जबर दुखापतीही झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः ग्रामीण भागांत व सुनसान पट्ट्यांमध्ये ही समस्या अधिक तीव्र आहे. कुत्र्यांचे टोळके एकत्रितपणे वाहनांच्या मागे लागतात, त्यामुळे चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गावकरी व प्रवासी नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना — जसे की रात्र गस्त, कुत्र्यांचे निर्बिजीकरण, आणि विशिष्ट भागात प्रकाशयोजना — त्वरित राबवण्यात याव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी यास गांभीर्याने घेऊन त्वरीत उपाययोजना कराव्यात, अन्यथा अपघात आणि जीवितहानी टाळणे कठीण होईल.