अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

चौल नाका, कुरुळ-नागाव परिसरात वाहतूक धोक्यात
छावा दि. २१ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर)
अलिबाग ते रेवदंडा मार्गावरील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले असून, या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे मोठ्या संकटाचे कारण ठरत आहे.
खड्ड्यांमुळे गाड्या सतत आपटत असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांचा जीव रोज टांगणीला लागतो आहे. यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष वाढला असून अनेक प्रवाशांना मणक्याचे त्रास, पाठीच्या कणा संबंधी आजार जाणवू लागले आहेत. खराब रस्त्यांमुळे प्रवासादरम्यान शारीरिक ताणतणाव वाढत असून वृद्ध आणि लहान मुलांनाही याचा त्रास होतो आहे.
पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांची खोली आणि ठिकाण समजत नाही, परिणामी वाहनचालक अचानक खड्ड्यात अडकून पडतात किंवा गाडी उलटते. यामुळे गंभीर अपघातही घडू लागले आहेत.
चौल नाका, कुरुळ, आणि नागाव या परिसरांमध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून स्थानिक नागरिक आणि पर्यटक दोघेही त्रस्त झाले आहेत. या भागातून अनेक पर्यटक समुद्रकिनाऱ्यांकडे वळतात, त्यामुळे रस्त्यावरील खड्डे ही पर्यटनालाही अडथळा ठरत आहेत.
स्थानिक प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा रस्त्याच्या दुर्दशेमुळे अपघातांचे प्रमाण अधिकच वाढेल आणि वाहनचालकांचा जीव धोक्यात येईल. रस्त्याचे तातडीने डागडुजी करून सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.