अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा;  पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाला ‘A+’ श्रेणी

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ राजेश बाष्टे ,|अलिबाग 📅 सोमवार | २३ फेब्रुवारी २०२६

राज्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे योग्य मापन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र द्वारे राबविण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) प्रक्रियेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यातील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वेश्वी या कनिष्ठ महाविद्यालयाने ‘A+’ (अ+) श्रेणी प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.

राज्यातील १.०२ लाख शाळांचे स्वयं-मूल्यांकन महाराष्ट्र राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाच्या वतीने राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात राज्यातील १,०२,६७५ शाळांनी scert-data.web.app या लिंकवरून आपले स्वयं-मूल्यांकन पूर्ण केले होते.

बाह्य मूल्यांकनाची कठोर प्रक्रिया- स्वयं-मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांपैकी, २०२५-२०२६ या वर्षात १०,७२१ शाळांची निवड ‘बाह्य मूल्यांकना’साठी (External Assessment) करण्यात आली होती. यापैकी १०,६४४ शाळांचे मूल्यांकन प्रत्यक्ष पडताळणीद्वारे पूर्ण करण्यात आले. या अत्यंत चुरशीच्या आणि निकोप प्रक्रियेत राज्यातील केवळ ४२९ शाळांना ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे.

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे विशेष यश- ‘अ’ श्रेणी मिळवणाऱ्या या निवडक शाळांमध्ये अलिबागच्या वेश्वी येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ट सोयी-सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर थेट ‘A+’ (अ+) मानांकन मिळवले आहे. या यशामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून महाविद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या यशामुळे अलिबागच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीने आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळत असल्याचे या मूल्यांकनातून स्पष्ट झाले आहे.

या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. जयंत पाटील, संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, खजिनदार नृपाल पाटील यांनी कॉलेजचे प्राचार्य रविंद्र पाटील, संचालक विक्रांत वार्डे, उपप्राचार्य निशिकांत कोळसे इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

“राज्यातील शाळांची गुणवत्ता जागतिक दर्जाची व्हावी, यासाठी SQAAF आराखडा तयार करण्यात आला आहे. या पारदर्शक प्रक्रियेमुळे शाळांना आपल्या उणिवा दूर करून प्रगती करण्याची संधी मिळत आहे.”

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *