अतिवृष्टी व अवकाळी पावसाने अलिबाग तालुक्यातील शेतकरी उध्वस्त शेकापकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

छावा डिजिटल न्यूज पोर्टल –अलिबाग — सचिन मयेकर  गुरुवार – ३0 ऑक्टोबर २०२५

दिनांक २६ ते २८ सप्टेंबर २५ तसेच २१ ते २८ ऑक्टोबर २५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे अलिबाग तालुक्यातील भात पिकासह सुपारी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे तयार भात पिके आडवी पडून भाताच्या कणसांना मोड आली असून अनेक शेतकऱ्यांनी शेतात कापणी करून ठेवलेले भाताचे कंस पाण्यात सडले आहेत.

या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. अलिबाग तालुक्यातील शेतकरी हे दरवर्षी फक्त एकदाच भात पिकाचे उत्पादन घेतात. त्यातच या अवकाळी व अतिवृष्टीमुळे हंगाम वाया गेल्याने शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाले आहेत. विशेषतः चौल, रेवदंडा, नागाव परिसरातील सुपारी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापतर्फे जिल्हाधिकारी, अलिबाग यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे अलिबाग तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आणि बागायतदारांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रसंगी शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस गौतम पाटील, राज्य कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाचिटणीस मंडळ सदस्य अनिल पाटील, माजी चिटणीस अनिल शांताराम पाटील, अॅड. परेश देशमुख, तालुका चिटणीस सुरेश भरत, शेतकरी सभा तालुका अध्यक्ष अनिल पाटील, अॅड. नीलम हजारे, रेवदंड्याच्या माजी सरपंच सोनाली मोरे, शे. कां.प. रेवदंडा शहर चिटणीस निलेश खोत, प्रमोद नवकारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

निवेदनात शेकापने शासनाला आवाहन केले आहे की

शेतकऱ्यांच्या आणि बागायतदारांच्या झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अन्यथा शेतकरी वर्ग पूर्णपणे कोसळेल.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *