अजूनही माणुसकी मेलेली नाही…

छावा, संपादकीय | दि. ०४ जुलै
आजच्या घडीला बातम्या पाहिल्या, ऐकल्या किंवा सोशल मीडियावर स्क्रोल केलं, की सर्वत्र फक्त नकारात्मकतेचं चित्र दिसतं — कुठे अपघात, कुठे खून, कुठे भ्रष्टाचार, कुठे नात्यांमध्ये विघटन. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला वाटतं, की आता जगात माणुसकीच उरलेली नाही. पण त्याच वेळी काही साधेसे प्रसंग, काही हळुवार क्षण आपल्याला दाखवून देतात की अजूनही माणुसकी मेलेली नाही.
काल मी आणि माझा मित्र बायपास रोडने चालत होतो. उन्हाळ्याची ती थोडीशी तापलेली दुपार होती. रस्त्यावर वाहतूक सुरू होती – चारचाकी, दुचाकी, ट्रक, रिक्षा यांची वर्दळ सुरू होती. आणि त्या गर्दीत, अचानक एक अगदी छोटंसं, केवळ दोन-तीन आठवड्यांचं मांजराचं पिल्लू रस्ता ओलांडायला लागलं.
आम्हाला एक क्षण भीती वाटली – एव्हढ्या भरधाव गाड्यांच्या मध्ये हे पिल्लू कसं वाचेल?
पण पुढे जे घडलं, ते पाहून मनात एक वेगळीच शांतता आणि समाधान दाटून आलं. एकामागोमाग एक वाहनचालक त्या पिल्लाकडे पाहत आपली गाडी थांबवत होते. काहीजणांनी गाडी एक बाजूला वळवली, काहींनी पूर्ण थांबून पिल्लू रस्ता ओलांडेपर्यंत वाट पाहिली. कोणीही हॉर्न वाजवला नाही, कोणीही चिडचिड केली नाही. त्या क्षणी त्या मुक्या जीवासाठी प्रत्येकजण जणू त्याचा संरक्षकच झाला होता.
त्या लहानशा जीवासाठी इतकी काळजी? आजच्या या धावपळीच्या जगात? हे दृश्य पाहून माझ्या डोळ्यांत नकळत पाणी आलं. मनात एकच विचार आला – हीच खरी माणुसकी!
कधी कधी आपण माणुसकीचा अर्थ फार मोठ्या गोष्टींमध्ये शोधतो – कोट्यवधींचं दान, एखादी थोर सेवा, समाजकार्य वगैरे. पण खरं सांगायचं झालं, तर माणुसकी म्हणजे आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक सजीवाप्रती – माणूस, प्राणी, पक्षी – यांच्याविषयी असलेली काळजी, सहानुभूती आणि आपुलकी.
आज जर एखादं लहान पिल्लू इतकं सुरक्षित वाटू शकतं, फक्त रस्त्यावर चालणाऱ्या अनोळखी लोकांमुळे, तर आपण नक्कीच अजून माणुसकी जपली आहे. आणि ही माणुसकीच आपल्याला जगण्यासाठी दिलासा देते, आशा देते, आणि पुन्हा पुन्हा माणूस म्हणून उभं राहण्याचं बळ देते.
म्हणूनच म्हणावसं वाटतं – “अजूनही माणुसकी मेलेली नाही.”
सचिन मयेकर