अंगणवाडी सेविका जिविता पाटील यांचा स्त्री सन्मान पुरस्काराने गौरव
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ राजेश बाष्टे अलिबाग ९ मार्च २०२६
पनवेल जागतिक महिला दिनानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसा प) रायगड जिल्हा महिला विभाग आणि नवीन पनवेल, पनवेल शाखेच्या वतीने आयोजित ‘सन्मान कर्तृत्वाचा – स्त्री सन्मान पुरस्कार सोहळ्या’त अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यकर्त्या जिविता पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सभागृह, मार्केटयार्ड, पनवेल येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर प्रमिला रवीशेठ पाटील, चित्रपट व नाट्य निर्मात्या कल्पना विलास कोठारी, सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे आणि संजय गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड कोमसापचे अध्यक्ष प्रा. एल. बी. पाटील हे होते.
कार्यक्रमाचे संयोजन कोमसाप नवीन पनवेलचे अध्यक्ष गणेश कोळी, महिला प्रमुख संध्या दिवकर तसेच पनवेल शाखेचे अध्यक्ष सुभाष कुडके यांनी केले.
यावेळी जिविता पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून कायदा विषयातील पदव्युत्तर पदवी (एलएलएम) प्रथम श्रेणीत संपादन करणारी पहिली अंगणवाडी सेविका होण्याचा मान मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ, नवीन पनवेल येथे प्राचार्या डॉ. सानवी देशमुख, सहप्राचार्या डॉ. धनश्री कदम आणि प्रा. डॉ. ममता भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एलएलएमचे शिक्षण पूर्ण केले.
जिविता पाटील यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी पदरात एक वर्षांचे मूल असताना त्यांना विधवापणाचा कठीण प्रसंग सहन करावा लागला. मात्र त्या खचल्या नाहीत. सासू मनोरमा पाटील यांच्या पाठिंब्याने त्यांनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पुन्हा सुरू केले. मुलाची जबाबदारी, आर्थिक अडचणी आणि कठीण परिस्थिती यावर मात करत त्यांनी भाजी विकणे, पतसंस्थांमध्ये खाती गोळा करणे अशी विविध कामे करत शिक्षण सुरू ठेवले.
अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी एम.ए., बी.एड., एम.ए. एज्युकेशन ही पदव्युत्तर शिक्षणे पूर्ण केली. २०११ साली एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत त्या अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झाल्या. समाजकार्याची आवड असल्याने त्यांनी या पदावर कार्य करताना महिलांसाठी बचतगट उभारणे, मुलांच्या शिक्षणासाठी मार्गदर्शन करणे अशा अनेक उपक्रमांतून समाजाशी घट्ट नाते जोडले.
दरम्यान त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, खारघर शाखेतून प्रा. स्मिता वारघडे यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसडब्ल्यू (मास्टर ऑफ सोशल वर्क) ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण केली. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक कार्याला अधिक गती दिली.
२०१८ ते २०२० या कालावधीत अलिबाग जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे प्रथम सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत त्यांनी अनेक वंचित घटकांना शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
महिलांसाठी आणि विशेषतः एकल महिलांसाठी काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. सध्या त्या ४८ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत त्यांना दत्तक घेऊन शिक्षणासाठी मदत करीत आहेत.
कोरोना काळात त्यांनी स्वतःची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही दागिने गहाण ठेवून ५४ कोरोना बाधित कुटुंबांना दहा दिवस दोन वेळचे जेवण पुरविले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना भारत भूषण पुरस्कार २०२२ (दिल्ली) प्रदान करण्यात आला.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या जिविता पाटील या आजही अभिमानाने स्वतःला अंगणवाडी सेविका म्हणून ओळख करून देतात. त्या सामाजिक कार्यकर्त्या, व्याख्याता, परीक्षक, संस्थापिका, पत्रकार तसेच विविध संस्थांच्या सदस्य म्हणून अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आहेत.
अंगणवाडी सेविकांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी पुढे कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी एलएलबी प्रथम श्रेणीत पूर्ण करून पुढे एलएलएम ही पदव्युत्तर पदवी यशस्वीरित्या संपादन केली. सध्या त्या डिप्लोमा इन काउन्सिलिंग या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत.
जिविता पाटील यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे त्या अनेक महिलांसाठी आदर्श ठरत आहेत.
![]()

