Views: 69

• भाडेकराराच्या आडून देहविक्रीचा धंदा

• अलिबाग पोलिसांची धडक कारवाई

• छावा, दि. २६ जून २०२५ • अलिबाग, विशेष प्रतिनिधी

अलिबागच्या पर्यटनभूमीत वासनांच्या जाळ्याचा गंध काही दिवसांपासून पसरू लागला होता. वरसोलीच्या शांत, समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसरात ‘लोटस लॉजिंग’ नावाच्या एका साध्याशा इमारतीत रात्रीचे तास वेगळेच रंग उधळत होते. स्थानिकांना काहीसं शंका वाटत होती, पण काहीच ठोस नव्हतं… तोवर पोलिसांच्या गुप्त बातमीदारांनी एक ठोस धागा पकडला – आणि या काळ्या व्यवहाराचा पर्दाफाश झाला.

पावणेचारची पहाट… आणि पोलिसांचा घाला!

२४ जून, मंगळवार. सकाळचे पावणेचार. बहुतेकांना वाटतं, या वेळेस फक्त कोकणातले कोंबडेच जागे असतात. पण त्या दिवशी, अलिबाग पोलिसांचं विशेष पथक जागे होते… आणि तयार होते.

गुप्त माहितीच्या आधारे बनावट ग्राहक पाठवून खातरजमा झाली. आणि अखेर ‘लोटस लॉजिंग’वर धाड पडली.

शांततेच्या नावाखाली चालणाऱ्या त्या खोल्यांमध्ये घडत होती अमानवी व्यवहारांची तडजोड. छाप्यात दोन मुख्य आरोपींना अटक झाली – आणि एक पीडित तरुणी त्या नरकातून बाहेर काढण्यात आली.

अटक झालेल्यांचा पर्दाफाश

या दोघांनी ‘लोटस लॉजिंग’ नावाचं लॉजिंग भाडे तत्वावर घेतले होते. पण त्याचा उद्देश पर्यटन नव्हता, तर लक्ष्मीच्या लाचारीचा सौदा करणे हा होता.

देहविक्रीचं जाळं – आणि ‘रेट कार्ड’ची माहिती

पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, तरुणींना वेगवेगळ्या राज्यांतून फूस लावून इथे आणले जात होते. एका ग्राहकासाठी २,५०० ते ३,००० रुपयांचं ‘पॅकेज’ ठरवण्यात येत होते.

छाप्यावेळी पोलिसांनी एका पीडित २७ वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले. तेव्हा अशी हकीगत समोर आली की, तिच्यावर मानसिक आणि आर्थिक पातळीवर दबाव आणून देहविक्रीस भाग पाडले जात होते.

पोलिसांची कडक कारवाई

या प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम १४३, तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन्स, रोख रक्कम ₹२१,५००, व्यवहारासंदर्भातील नोंदी जप्त केल्या आहेत.

या ‘लोटस’चा उगम नरकातून?

‘लोटस’ या शब्दाचा अर्थ आहे पवित्र कमळ. पण वरसोलीतील हे लॉजिंग मात्र ‘कमळा’सारख्या अनेक तरुण मुलींचे पावित्र्य लुटणाऱ्या विखारी व्यवसायाचा अड्डा बनला होता. भाड्याने लॉज घेतलेलं असले, तरी त्यामागे राज्यपातळीवर चालणारे एक साखळी-जाळं असल्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही.

पश्चिम बंगाल ते कोकण – स्त्रियांची तस्करी?

अटक झालेली महिला – ज्योत्स्ना दास – ही पश्चिम बंगालहून कोकणात आली होती. तिच्या मोबाइलमध्ये इतर मुलींचे फोटो, संभाषण, आणि व्यवहाराच्या नोंदी असल्याचं प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यामुळे ही स्त्री-तस्करीची साखळी आहे का? याचा तपास सुरू आहे.

वरसोलीतील ही कारवाई केवळ पोलिसांची यशस्वी मोहीम नव्हे, तर समाजाला हादरवणारी जागृती आहे. पर्यटनाच्या, शांततेच्या नावाखाली अशा घाणेरड्या धंद्यांना आळा घालणं हे केवळ पोलीस दलाचं नव्हे, तर प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य आहे.

पण सरते शेवटी एक प्रश्न अनुत्तरीतच राहतो की, वरसोलीत आज जे उघड झाले, ते उद्या आपल्या शेजारील मोहल्ल्यातही होऊ शकतं का? पोलिसांनी धाड टाकली, आरोपी अटकेत आहेत, पीडितेची सुटका झाली — हे सर्व महत्वाचे आहेच. पण या काळ्या बाजारातून मुलींची खरेदी करणारे ग्राहक कोठे आहेत? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आणि कठोर शिक्षा होणं – हेच या कारवाईचे खऱ्या अर्थाने समाधान ठरेल.