Views: 46

• लाईट ऑफ लाईफ ट्रस्टकडून शैक्षणिक साहित्य वाटप

• बोर्ली, वळके, रामराज व बेलोशी येथील ४५५ लाभार्थी

• छावा, दि. २५ जून • अलिबाग, विशेष प्रतिनिधी

लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या अलिबाग विभागामार्फत दिनांक २१ आणि २२ जून २०२५ रोजी बोर्ली, वळके, रामराज आणि बेलोशी या चार केंद्रांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेच्या या उपक्रमांतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वी या वर्गातील एकूण ४५५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांना विद्यार्थी आणि पालक मिळून ९५० हून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावली.

लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही संस्था २००५ पासून देशभर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासंदर्भातील उपक्रम राबवित आहे. “तळागाळातील गरीब व होतकरू मुले शाळेत गेली पाहिजेत आणि टिकली पाहिजेत” या उद्देशाने संस्था गेल्या १९ वर्षांपासून अलिबागमध्ये कार्यरत आहे. याच ध्येयाने प्रेरित होऊन यंदाच्या वर्षीही चार केंद्रांत साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले.

२१ जून रोजी रामराज आणि बेलोशी केंद्रांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर २२ जून रोजी बोर्लीमधील साई मंदिर परिसरात आणि वळकेमधील बापदेव मंदिरात विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले. या प्रसंगी विविध शाळांतील शिक्षक, पालक व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला सौ. सपना जायपाटील (सरपंच, बोर्ली ग्रामपंचायत), सौ. संगीता भगत (मुख्याध्यापिका, रा.जि.प. शाळा चोरढे), श्री. गोरक्षनाथ मोहिते, श्री. रसाळ सर, श्री. खडपे सर, श्री. शिंदे सर, सौ. वारगे मॅडम आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि उपस्थितीने कार्यक्रमाची गुणवत्ता अधिकच वाढली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आर्या राऊत, अनुजा राउळ, रश्मी अष्टमकर, राणी जाधव, अपेक्षा शेळके, सोनल घरत यांच्यासह इतर शिक्षक व स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे पार पडला.

लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून शिक्षणाविषयी सकारात्मक जाणीव व आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला आहे.