रायगड जिल्ह्यातील झिराड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस हायकल लिमिटेडच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून तब्बल १२ लाख रुपयांचे शालोपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले. या शैक्षणिक विकास उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आहे.
रायगडचे उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेत्या मानसीताई दळवी आणि हायकल लिमिटेडचे अध्यक्ष जय हिरेमठ यांनी उपस्थिती लावली.
यासोबतच हायकल लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक समीर हिरेमठ, संचालिका सुगंधा हिरेमठ, तसेच झिराडच्या माजी सरपंच दर्शना भोईर, माजी समाजकल्याण सभापती व शिवसेना नेते दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ, आणि राजिपचे प्राथमिक शिक्षण उपशिक्षणाधिकारी सुनील भोपाळे यांच्यासह झिराड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेश माने, माजी उपसरपंच संध्या गावडे, अलिबाग पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, आणि ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांसह झिराड गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साधने, शिक्षण साहित्य, आणि इतर आवश्यक शाळा उपयोगी वस्तू प्रदान करण्यात आल्या. ह्या उपक्रमामुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रयत्नांना बळकटी मिळणार आहे.
हायकल लिमिटेडच्या अध्यक्ष जय हिरेमठ यांनी समाजासाठी शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्याच्या महत्त्वावर भाष्य केले. याशिवाय उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. मुख्याध्यापिका रुपाली पेढवी आणि शिक्षक वृंद यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.