Views: 8

• आज दुपारी ४ वाजेपर्यंत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

• छावा • अलिबाग दि.१६ जून • प्रतिनिधी

हवामान विभागाने (IMD) रायगड जिल्ह्यासाठी आज दुपारी ४ वाजेपर्यंत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत अतीवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीसह वादळी वाऱ्यांचे सत्र सुरू राहण्याची शक्यता असून नदी, नाले आणि दरड कोसळण्याच्या धोक्याच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून जिल्हा प्रशासन, पोलिस, महसूल आणि आरोग्य विभाग सतर्क आहेत. दरम्यान, नागरिकांनी खबरदारीचे उपाय उदा. घरातच राहणे, विजेच्या तारा, झाडांपासून दूर राहणे, तसेच खोल पाण्याच्या भागात न जाणे यांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे.

Loading