पितृदिन म्हटलं की अनेकांच्या मनात आठवणी दाटून येतात. कोणी स्मरणरूपी कार्यक्रम घेतात, तर कोणी धार्मिक विधी करतात. मात्र, रेवदंड्यातील दोन तरुणांनी आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतींना कृतीतून आदरांजली अर्पण करत, सामाजिकतेचा अनोखा आदर्श समोर ठेवला.
ओएसिस बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, रेवदंडाचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते प्रतिक कोळी व एस. एम. न्यूज. मराठी चॅनेल तथा छावा पोर्टल न्युज मीडिया संस्थापक संपादक सचिन मयेकर या दोघांनी मिळून ३५ गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. विशेष म्हणजे, शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी घरोघरी जाऊन, त्यांनी ही मदत वैयक्तिक खर्चातून केली.
उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे – “वडिलांनी दिलेली सामाजिक जाणीव पुढे नेणे.” यासाठी त्यांनी कोणताही मोठा कार्यक्रम किंवा झगमगाट न करता, घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक वही, पेन, पेन्सिल अशा लेखन साहित्याचे वाटप केले.
या उपक्रमात ओएसिस बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, रेवदंडा आणि एस एम न्यूज मराठी छावा ऑनलाईन पोर्टल मीडिया यांचा सहभाग होता. दोघांच्याही संस्था सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यात सक्रीय असल्या तरी, ‘इव्हेंट’च्या झगमगाटात मुख्य हेतू हरवू नये, याची खबरदारी घेत, मदत प्रत्यक्ष घरपोच पोहोचवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या आदल्या दिवशी, समाजात सकारात्मकतेचा सुस्पष्ट संदेश देत हा उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न करताना, सामाजिक जबाबदारी आणि पितृस्मृतींची जपणूक हे या उपक्रमाचे खरे स्वरूप ठरले.
मनोगत
“ही मदत म्हणजे केवळ साहित्य वाटप नव्हे, तर वडिलांनी दिलेल्या मूल्यांची कृतीशील आठवण आहे.” :- प्रतिक कोळी, युवा सामाजिक कार्यकर्ते
“पत्रकारितेसोबतच समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव वडिलांकडून मिळाली. आज ती प्रत्यक्ष कृतीतून साकारली.” :- सचिन मयेकर, पत्रकार
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून, आम्ही आपापल्या परीने जबाबदाऱ्या निभावत आहोत. भावाची नववीची शाळा सुरू होण्याच्या तोंडावर साहित्याची अडचण होती, आणि अशा वेळी प्रतीक दादा व सचिन काकांची मिळालेली मदत फार मोलाची ठरली. आम्ही सहकुटुंब त्यांच्या या मदतीबद्दल मनापासून आभारी आहोत. – प्रियेशा लाड, रेवदंडा