भारतातील उच्च शिक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा आज गाठण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासनाने पाच नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत आशयपत्रे स्वाक्षरी करून नवी मुंबईत जागतिक शैक्षणिक हब उभारण्याची घोषणा केली.
मुंबईतील हॉटेल ताज येथे ‘मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय शिक्षण सचिव विनित जोशी, सिडकोचे एमडी विजय सिंघल, विविध देशांचे कॉन्सुल जनरल व विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
“विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची गरज भासणार नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या कॅम्पसमुळे भारतातच जागतिक दर्जाचं शिक्षण उपलब्ध होणार आहे. शिक्षणाचा हब, हेल्थ सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी अशा बहुविध योजनांनी हा परिसर भारताच्या शैक्षणिक भविष्याचं केंद्रबिंदू ठरेल.”
“मुंबई ही आता केवळ आर्थिक राजधानी नव्हे, तर आंतरराष्ट्रीय शिक्षण हब म्हणूनही उदयास येईल. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे भारतात जागतिक विद्यापीठे येत आहेत, आणि भारतीय संस्था परदेशात पोहोचत आहेत.” :- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं नवं पर्व सुरू होत आहे. परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न आता घराजवळच पूर्ण होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात भारताचा नवा अध्याय आणि नव्या शक्यतांचा प्रारंभ या निर्णयाने निश्चितच झाला असल्याचा सूर उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आला आहे.
०१. युनिव्हर्सिटी ऑफ अॅबरडीन (यूके) – भारतात कॅम्पस सुरू करणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ
०२. युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (यूके) – रसेल ग्रुपमधील, संशोधन आणि AI, सायबर सुरक्षा विषयात अग्रगण्य
०३. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ (ऑस्ट्रेलिया) – ‘ग्रुप ऑफ एट’चा सदस्य, STEM क्षेत्रात आघाडी
०४. इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका) – अमेरिका बाहेर पूर्ण कॅम्पस सुरू करणारे पहिले विद्यापीठ
०५. इस्टिटुटो युरोपियो डी डिझाईन (IED – इटली) – फॅशन, डिझाईन आणि कम्युनिकेशनमधील अग्रगण्य संस्था
या पाच विद्यापीठांमुळे केवळ शिक्षण नव्हे, तर भारताच्या जागतिक नेतृत्वाची वाटचालही सुलभ होणार आहे. उच्च दर्जाच्या अभ्यासक्रमांसह संशोधन, इंटर्नशिप, इनोव्हेशन यासाठी एक स्वतंत्र पारिसंस्था (ecosystem) उभी राहील. यामुळे भारताचं “विकसित भारत २०४७” हे स्वप्न पूर्णत्वाकडे जाईल, असा विश्वास जनमानसातून व्यक्त केला जात आहे.