Views: 5

• नागपुरात उभारणार हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प

• ₹८,००० कोटींची गुंतवणूक, २,००० रोजगार संधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेससोबत सामंजस्य करार

• छावा • नागपूर, दि. १३ जून • वृत्तसंस्था

नागपूरमध्ये सुमारे ₹८,००० कोटींची गुंतवणूक करत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. कंपनी हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागासोबत सामंजस्य करार झाला.

या प्रकल्पामुळे २०२६ पासून प्रत्यक्ष उत्पादन कार्य सुरू होणार असून, सुमारे २,००० थेट व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार आहेत. हा महाराष्ट्रातील पहिलाच समर्पित हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प असून, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला बळ देणारा महत्त्वाचा टप्पा आहे.

रोटरी-विंग प्लॅटफॉर्म्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग यासाठी ‘Centre of Excellence’ म्हणून कार्य करणाऱ्या या युनिटमुळे नागपूर आणि राज्यासाठी एरोस्पेस क्षेत्रात नवे दालन खुले होणार आहे. विद्यमान पायाभूत सुविधा आणि नागपूर विमानतळाच्या जवळील स्थानामुळे लॉजिस्टिक लाभही मिळणार आहे.

या कार्यक्रमात उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन, मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी, आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Loading