Views: 6

सेवानिवृत्त युद्धनौका सिंधुदुर्ग समुद्रतळाशी स्थिरावणार

•छावा • मुंबई, दि. १० जून • प्रतिनिधी 

भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झालेली युद्धनौका आयएनएस गुलदार आता सागरी पर्यटन आणि संवर्धनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत निवती रॉक (सिंधुदुर्ग) येथील समुद्रात पाण्याखालील संग्रहालय व कृत्रिम प्रवाळरचना (रीफ) म्हणून रूपांतरित केली जाणार आहे. भारतातील हा पहिलाच उपक्रम असून सागरी जैवविविधतेचे संवर्धन करत स्कुबा डायव्हिंग, पाणबुडी पर्यटनास चालना देणारा प्रकल्प ठरणार आहे.

या अनोख्या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

पाणबुडी पर्यटनास चालना; MTDCच्या माध्यमातून प्रकल्प राबवणार

भारतीय नौदलाने INS Guldar हे सेवानिवृत्त युद्धनौकेचे MTDC (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) कडे विना मोबदला हस्तांतरीत केले आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने Ex-INS Guldar Underwater Museum, Artificial Reef & Submarine Tourism Project या नावाने या प्रकल्पास ₹46.91 कोटींची आर्थिक मंजुरी 27 डिसेंबर 2024 रोजी दिली आहे.

 

भविष्यातील पर्यटन संधी:

नाविक प्रशिक्षणासाठी वापरली गेलेली आणि 1120 टन वजनाची, 83.9 मीटर लांब आणि 9.7 मीटर रुंद असलेली ही नौका, सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक येथील समुद्रात सागरी तळाशी विराजमान केली जाणार आहे. प्रवाळ वाढीसाठी योग्य वातावरण तयार करून येथे स्कुबा डायव्हिंग आणि पाणबुडी पर्यटन विकसित केले जाईल.

 

प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे टप्पे:

या प्रकल्पात MTDC, महाराष्ट्र सागरी मंडळ, माजगाव डॉक, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच नौदल यांचा समन्वय लाभला आहे. पर्यावरण पूरकतेची काळजी घेत समुद्रात प्रवाळवाढीस अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा यामागचा उद्देश आहे.

मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन :

“हा उपक्रम भारतात सागरी पर्यटनाला चालना देणारा मैलाचा दगड ठरेल. या अनोख्या संग्रहालयामुळे सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक सागरी पर्यटन नकाशावर ठळकपणे विराजमान होईल,” :-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य