Views: 21

वटसावित्री पौर्णिमा : निष्ठा, श्रद्धा आणि पत्नीचे सामर्थ्य यांचे प्रतीक

छावा •संपादकीय (वटसावित्री पौर्णिमा विशेष) • रायगड, दि. १०

ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटसावित्री पौर्णिमा, विवाहित स्त्रियांसाठी श्रद्धा, प्रेम, आणि समर्पणाचे प्रतीक असलेला पवित्र दिवस. संपूर्ण राज्यात हा सण अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पारंपरिक पोशाखात सांज शृंगार करून महिला वडाच्या वृक्षाच्या पूजनासाठी घराबाहेर पडत आहेत. अनेक नववधू ज्यांची पहिली वटपौर्णिमा आहे, त्यांच्या डोळ्यात आपल्या. नवजीवनचे आणि भावी सुखी संसाराचे स्वप्नवत अवकाश अशा अपेक्षांच्या ताऱ्यांनी सजले आहे. कारण या सणाचे महत्त्व केवळ धार्मिक नसून, स्त्रीच्या दृढ निश्चयाचे आणि अढळ प्रेमाचे हे जणू प्रतीक आहे.

पतिव्रतेचे सामर्थ्य: पौराणिक प्रेरणा

पौराणिक कथेनुसार, सावित्री या पतिव्रता स्त्रीने यमराजाकडून आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले. ती चिकाटी, चातुर्य, आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने युक्त होती. ती केवळ पतिव्रतेचा आदर्श नव्हे तर आजच्या महिलांसाठीही प्रेरणास्रोत आहे.

सावित्रीच्या भक्तीचा आणि धैर्याचा स्मरण करताना, स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून पुढील प्रार्थना करतात:

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी ।
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात् ॥

अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते ।
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ॥

वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन: ।
वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ॥

ही प्रार्थना म्हणजे पत्नीच्या भावना, निष्ठा आणि प्रबळ इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. ती प्रार्थना करते की जसे सावित्रीने आपल्या पतीसह अखंड आयुष्य घालवले, तसेच मला आणि माझ्या पतीला प्रत्येक जन्मात एकत्र राहता यावे.

वडाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

वडाच्या झाडाला आयुष्य, समृद्धी आणि सातत्याचे प्रतीक मानले जाते. हे झाड २४ तास प्राणवायू निर्माण करून पर्यावरण शुद्ध ठेवते. महिलांनी पूजेसाठी निवडलेले हे झाड फक्त श्रद्धेचे नाही, तर निसर्गसंवर्धनाचेही प्रतीक आहे. जसे स्त्री आपल्या कुटुंबाचे रक्षण करते, तसेच वड वृक्ष पर्यावरणाचे रक्षण करतो. या झाडाच्या पारंब्या जशा जमिनीशी घट्ट जोडलेल्या असतात, तशाच स्त्रियाही आपल्या घराशी, कुटुंबाशी घट्ट जोडलेल्या असतात.

वटमूले स्थितो ब्रह्मा, वटमध्ये जनार्दनः” या वचनातून त्याचे धार्मिक महत्त्व अधोरेखित होते. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाभोवती तीन प्रदक्षिणा घालून, पूजन करून, निर्जल व्रत ठेवतात. त्या प्रार्थना करतात की – “मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न, दीर्घायुष्य लाभो. आमचा संसार संततीने, सुख-समृद्धीने भरून निघो.”

सांस्कृतिक वारशाचे जतन

वटसावित्री व्रत महाराष्ट्र, गोवा आणि अन्य पश्चिम भारतातील राज्यांमध्ये विशेष उत्साहाने साजरे केले जाते. अशा सणांमधून आपल्या सांस्कृतिक मुळे जपल्या जातात. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरा स्त्रियांच्या मानसिक बळाचे, त्यागाचे आणि संसारातील त्यांच्यावरील जबाबदारीचे प्रतीक ठरतात.

नवदांपत्य आणि नवयुवतींसाठी प्रेरणा

आजच्या काळात, जिथे नातेसंबंधांमध्ये क्षणभंगुरता जाणवते, तिथे सावित्रीसारख्या व्यक्तिमत्त्वाची आठवण नवदांपत्यांना नातेसंबंधांमध्ये दृढता आणण्यासाठी प्रेरणा देते. वटसावित्री हे केवळ व्रत नाही, तर एक सामाजिक संदेश आहे – “प्रेम, विश्वास आणि चिकाटी यांच्या बळावर काहीही शक्य आहे.

Loading