Views: 21

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

♦ दुर्गराज रायगडावर शिवछत्रपतींचा तिथीवत राज्याभिषेक सोहळा संपन्न

छावा • महाड, दि. ०९ जून (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) | विशेष प्रतिनिधी 

“रायगड ही पवित्र भूमी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. जर शिवराज्याभिषेक झाला नसता तर आपण आज इथे नसतो. त्यांनी जात, पात, धर्म या सर्व भिंती मोडून ‘रयतेचे राज्य’ प्रस्थापित केले. त्यामुळे ते फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण भारताचे राष्ट्रनायक आहेत”, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा राज्याभिषेक दिन रायगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात व श्रद्धेने साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून त्यांनी महाराष्ट्रतील जनतेशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानप्रती घेतलेली भूमिका ही देखील शिवाजी महाराजांच्या राष्ट्रवादाच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. काळ कितीही बदलला, तंत्रज्ञान कितीही पुढे गेले, तरी शिवरायांचा वारसा कधीच विसरला जाऊ शकत नाही.”

‘शिवसृष्टी’ निर्मितीसाठी शासनाची सर्वतोपरी मदत 

 

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केले की, पाचाड येथे शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असून, त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. “शिवसृष्टी हे केवळ एक प्रकल्प नसून महाराजांचे विचार, पराक्रम आणि प्रशासनाची तत्त्वे नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम असेल,” असे त्यांनी नमूद केले.

गडकोट, मंदिरांचे जतन व संवर्धन राज्य शासनाचा प्राधान्यक्रम

शिंदे यांनी सांगितले की, “राज्य शासनाने गडकोट आणि ऐतिहासिक मंदिरांचे संवर्धन व पुनरुत्थान करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी नियोजनबद्ध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.”

राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष नितीन पावळे आणि राज्यातून आलेले हजारो शिवभक्त उपस्थित होते.


पारंपरिक शिवमर्दानी खेळाचे सादरीकरण करताना शिवप्रेमी

 

Loading