Views: 6

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

शिवप्रेमींच्या घोषणांनी गड दुमदुमला; महाराजांच्या आठवणींना उजाळा

अलिबाग (विशेष प्रतिनिधी, दि. ०६ जून) युगपुरुष, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक दिन दुर्गराज रायगडावर अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि ऐतिहासिक वातावरणात साजरा करण्यात आला. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.

याप्रसंगी छत्रपती संभाजी राजे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस महानिरीक्षक कोकण विभाग संजय दराडे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी तथा मान्यवर उपस्थित होते.

सकाळी सांप्रदायिक मंत्रोच्चार व ढोल-ताशांच्या गजरात नगारखान्यावर भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण झाले. यावेळी संभाजी राजे छत्रपती उपस्थित होते.
सकाळी ९:४५ वाजता, राजसभागृहातील सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला.
छत्रपती संभाजी राजे आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले. शिवभक्तांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण व पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांनी लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण शिवमय झालं असल्याचं पाहायला मिळाले.
महाराष्ट्रातील विविध भागांतून हजारो शिवप्रेमींनी गडावर गर्दी केली. सोशल मीडियावर #शिवराज्याभिषेक२०२५ ट्रेंडमध्ये असून अनेकांनी परेडचे व्हिडिओ, फोटो आणि अनुभव शेअर केले.

राज्यभरातून उत्सवाची अनुभूती

फक्त रायगडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरात आजचा दिवस मोठ्या श्रद्धा आणि अभिमानाने साजरा केला जात आहे. विविध संस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ प्रभात फेऱ्या, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ एक ऐतिहासिक दिन नसून मराठी अस्मितेचा आणि स्वराज्याच्या तत्त्वज्ञानाचा उत्सव आहे. रायगडावरचा उत्साह आणि भक्ती याने आजही छत्रपतींच्या स्मृती जिवंत आहेत, आणि पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील. :- सुचित जावरे, शिवपाईक – नागोठणे

रायगडाचे हे ऐतिहासिक आणि धार्मिक पर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनवृत्ताचा गौरव असून, राष्ट्रीय अभिमान आणि सांस्कृतिक एकात्मतेची अनुभूती देणारा झाला. :- दर्श नागोटकर, शिवपाईक – मांडला