Views: 5

•  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

• सामाजिक विभाजन टाळण्याचे आवाहन

• छावा • नवी दिल्ली, दि. २२ जून २०२५ • वृत्तसंस्था

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंदुत्वाची व्यापक व्याख्या करताना हे फक्त पूजा पद्धतीशी जोडले जाणारे संकुचित तत्व नाही, तर ही जीवन जगण्याची पद्धती असल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने हिंदुत्वाच्या व्याख्येबद्दल नव्या चर्चांना वाचा फोडली आहे.

गडकरी यांनी सांगितले की, “मंदिरात जाऊन पूजा करणे म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्वाचा संबंध जीवनशैलीशी आहे.” त्यांनी पुढे हेही स्पष्ट केले की हिंदुत्वाचे तत्व स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. हेडगेवार यांच्या विचारसरणीतून आले आहे. हिंदुत्वाचे स्वरूप राष्ट्रवाद, सहिष्णुता, आणि सर्वसमावेशकतेवर आधारित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

गडकरी म्हणाले की, हिंदुत्व ही सहिष्णुतेची शिकवण देते. त्यांनी जात आणि धर्म या मुद्द्यांवर आधारित सामाजिक विभाजन टाळण्याचे आवाहन करत सांगितले की, “माझ्या सार्वजनिक चर्चेत मी धर्म आणि जातीला स्थान देत नाही.”

गडकरी यांनी देशातील बहुधर्मीय संस्कृतीचे कौतुक करत सांगितले की, भारतीय धर्मनिरपेक्षता हिंदू सहिष्णुतेमुळे शक्य झाली आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की, “प्रत्येक मुस्लिम हिंसा समर्थक नसतो. इस्लामला दहशतवादाशी जोडणे ही भारतीय तत्त्वज्ञानाविरोधात आहे.

गडकरी यांच्या विधानामुळे हिंदुत्वाची व्याख्या केवळ धार्मिक विधींपलीकडे नेण्याचा प्रयत्न दिसतो. या विचारांनी हिंदुत्व हे केवळ एक धार्मिक संकल्पना नसून, ती जीवनपद्धती, नैतिकता आणि राष्ट्रप्रेमावर आधारित तत्वज्ञान असल्याचा संदेश दिला आहे.

गडकरी यांचे हिंदुत्वाचे विचार सामाजिक आणि राजकीय क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. त्यांच्या या विधानामुळे हिंदुत्वाच्या व्यापक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनावर अधिक प्रकाश पडेल, अशी अपेक्षा आहे.