रेवदंडा पुलानजीक गेल्या अनेक वर्षांपासून समुद्रात अर्धवट बुडालेल्या आणि होड्यांच्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेल्या जुन्या बार्ज हटविण्याची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेवदंडा शाखाध्यक्ष श्री. प्रशांत रामचंद्र वरसोलकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कार्यवाही शक्य झाली आहे.
या बार्जमुळे कुंडलिका नदी मार्गे होड्या, मच्छीमारांची बोटी व अन्य बार्जची सुरक्षित वाहतूक धोक्यात आली होती. भरतीच्या वेळेस ही बार्ज पूर्णपणे पाण्यात बुडत असल्याने नव्याने येणाऱ्या बोटी व बार्जना तिचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक मच्छीमार व समुद्रमार्गावरील व्यावसायिकांनी अनेकवेळा तक्रारी करून नाराजी व्यक्त केली होती.
रेवदंडा बंदर निरीक्षक सतीश देशमुख यांनी संबंधित बार्ज मालकास नोटीस देऊन ती हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र दीर्घकाळ सहकार्य न केल्याने ही प्रक्रिया रखडली होती. या पार्श्वभूमीवर प्रशांत वरसोलकर यांनी दिनांक २ मार्च २०२५ रोजी पोर्ट अधिकाऱ्यांना पत्र सादर करून थेट कृतीची मागणी केली होती.
“जेव्हा पर्यंत ही बार्ज मालक स्वतः हटवत नाही, तेव्हा प्रशासनाने कारवाई करून ती हटवावी, अन्यथा होड्यांना अपघात अटळ,” असे त्यांनी पत्रात ठणकावून सांगितले होते
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपानंतर, विशेषतः प्रशांत वरसोलकर यांच्या लेखी निवेदनानंतर बार्ज हटवण्याची कारवाई सुरु केली आहे. याकरिता आता बार्ज हटवण्याचे यंत्र, क्रेन व लोकशक्तीच्या मदतीने काम सुरू झाल्याचे दिसत आहे.
या विकासामुळे स्थानिक मच्छीमारांनी समाधान व्यक्त केले असून, वाहतुकीसाठीचा समुद्र मार्ग लवकरच अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“पाण्याखाली बुडालेली ही बार्ज आमच्या रोजच्या प्रवासासाठी मोठा धोका होती. अपघात टळणं ही फक्त नशिबाची गोष्ट होती. मनसेच्या हस्तक्षेपामुळे ही समस्या संपणार आहे, याचा आम्हाला आनंद आहे.” : आनंद बळी, स्थानिक मच्छीमार