रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक भागांमध्ये उद्भवणाऱ्या संभाव्य आंदोलनांमुळे तसेच आगामी धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २४ जून २०२५ रोजी ००:०१ वाजल्यापासून ते ८ जुलै २०२५ रात्री २४:०० वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी रायगड यांच्या आदेशाने व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शिफारशीनुसार निर्गमित करण्यात आला आहे.
खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे व अलिबाग या औद्योगिक पट्ट्यात कामगार संघटनांकडून आंदोलन व संप पुकारले जात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे याठिकाणी अस्थिरतेची शक्यता लक्षात घेऊन ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
शिवाय मोहरम (२७ जून ते ६ जुलै) या कालावधीत ७२ मिरवणुका व ५ ठिकाणी नमाज पठणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच ६ जुलै रोजी आषाढी एकादशी सण साजरा होणार आहे. दोन्ही समाजांच्या सणांमुळे धार्मिक तणाव उद्भवू नये म्हणून प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
या आदेशातून शासकीय अधिकारी, कर्तव्यावर असलेले कर्मचारी, तसेच शवयात्रा व अंत्यविधीच्या जमावाला सूट देण्यात आली आहे. याशिवाय तहसीलदार वा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून परवानगी प्राप्त कार्यक्रमांना जमावबंदीच्या आदेशातून सूट असेल.
प्रशासनाने नागरिकांनी शांतता राखण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.