१६ जूनपासून नविन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असून, जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये यंदाही प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे मनोवेधक स्वागत, प्रभातफेरी, रांगोळी, तोरण सजावट तसेच मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांची माहिती देताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील एकही बालक शाळेबाहेर राहणार नाही, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. या दृष्टीने विविध जनजागृती मोहिमा राबविल्या जात आहेत.”
शाळा परिसर सजविण्यात येणार असून, रांगोळ्या, तोरण, फुगे आदींचा वापर करून विद्यार्थ्यांचे स्वागत होईल. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत करण्यात येईल. प्रभातफेरीचे आयोजन करून गावकऱ्यांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाच्या बालभारती विभागाकडून मागवलेली पाठ्यपुस्तके सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात आहेत. जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १,८१,५४८ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके तसेच ९८,५७२ विद्यार्थ्यांना गणवेश वितरित केले जाणार आहेत.
६ ते १४ वयोगटातील प्रवेश पात्र बालकांची यादी ग्रामपंचायत व शाळा फलकांवर प्रदर्शित करण्यात येणार असून, लाउडस्पीकरवर घोषणाही केली जाणार आहे. शैक्षणिक पदयात्रा, शिक्षकांच्या गृहभेटी, आणि गावपातळीवर सरपंच, गावकरी, बचतगट, ज्येष्ठ नागरिक व युवकांचा सहभाग घेऊन जनजागृती केली जाणार आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत ‘एकही विद्यार्थी शाळेबाहेर नाही’ अशी प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. तसेच वर्षभर शंभर टक्के उपस्थितीसाठी आवश्यक उपाय योजनांची माहिती देण्यात येईल. जिल्हास्तरीय अधिकारी आणि कर्मचारी यांचीदेखील शाळांना भेटीची रूपरेषा आखण्यात आली आहे.