Views: 4

• १६ ते ३० जूनदरम्यान जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये सेवा शिबिरे

• जिल्हाधिकारी किशन जावळे यांची पत्रकार परिषदेत माहिती

• छावा • अलिबाग, दि १३ जून • प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात सुरू असलेल्या ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत रायगड जिल्ह्यात १६ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत ११३ आदिवासी गावांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमधून आदिवासी लाभार्थ्यांना थेट गावपातळीवर विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या अभियानाची अंमलबजावणी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM-JANMAN)च्या धर्तीवर केली जात आहे. यामध्ये आधार कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, पीएम किसान सन्मान, जनधन खाते, उज्वला योजना, जातीचे व रहिवासी दाखले, घरकुल, मातृ वंदना योजना, आरोग्य तपासणी आदी सेवा दिल्या जाणार आहेत.

जिल्हास्तर व तालुकास्तर समित्या स्थापन

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, सह-अध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तर सदस्य सचिव म्हणून आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, पेण काम पाहणार आहेत.

११३ आदिवासी गावांचा समावेश

अभियानात सहभागी होणाऱ्या ११३ गावांमध्ये सर्वाधिक गावे कर्जत (२४) व पेण (२०) तालुक्यात आहेत. उरण (२), पनवेल (१४), खालापूर (१०), अलिबाग (१३), मुरूड (२), रोहा (९), सुधागड (१०), माणगाव (२), तळा (१), श्रीवर्धन (३), म्हसळा (१), महाड (२) या तालुक्यांचाही समावेश आहे.

जिल्हा प्रशासनामार्फत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या माध्यमातून ही शिबिरे गावागावात पार पडणार असून, आदिवासी नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ थेट पोहोचवण्याचा मुख्य उद्देश आहे.

Loading