राज्यात यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा उशिरा दाखल होत असून, १४ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाज असून, पूर्व विदर्भात तापमान ४५ अंशांपर्यंत जाऊ शकते. या भागातील नागरिकांनी उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्याबाबत काळजी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात १४ जूनपर्यंत सार्वत्रिक पावसाची शक्यता कमी असून, पावसाची नोंद ही केवळ काही ठिकाणी आणि तीही दुपारनंतर मेघगर्जनेसह होण्याची शक्यता आहे. दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाच्या सरी पडण्याची अधिक शक्यता आहे. मात्र, राज्यातील उर्वरित भागांत पावसाचे प्रमाण विखुरलेले आणि अल्प स्वरूपाचे राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या जमिनीत पर्याप्त ओलावा नसल्यामुळे आणि पावसाचा निश्चित कालावधी अस्पष्ट असल्यामुळे शेतकऱ्यांनी विशेषतः कोरडवाहू शेती करणाऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. पावसाचा पहिला जोरदार खंड आणि जमिनीत पुरेशी ओलावा स्थिती निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी, असे मार्गदर्शन कृषी तज्ज्ञांनी दिले आहे.