मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात नुकतीच झालेली गुप्त बैठक सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे. ही बैठक जवळपास एक तासापर्यंत सुरू होती आणि ती कोणत्याही अधिकृत घोषणेशिवाय पार पडल्यामुळे अनेक तर्कवितर्कांना तोंड फुटले आहे.
ही भेट मनसे व शिवसेना (उद्धव गट) यांच्यातील युतीबाबतच्या अलीकडील चर्चांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मुंबई महापालिका निवडणुका आणि राज्यातील आगामी राजकीय गठजोडींसंदर्भात चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांदरम्यान भाजपकडून राज ठाकरे यांच्याशी थेट संवाद साधल्याने, शिवसेनेच्या राजकीय धोरणांवर दबाव आणण्याची रणनीती दिसून येते.
बैठकीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना “उबाठा गटाला आता उत्तर द्यायचं आहे”, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याचं मानलं जात आहे. तर याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सावध प्रतिक्रिया देताना गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, “राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस काय बोलले हे माहिती नसल्यामुळे सध्या काहीही बोलणं योग्य ठरणार नाही.” त्याचवेळी पक्षातील इतर नेत्यांनी यास भाजपची “फोडाफोडी” ची राजकीय नीती असल्याचा आरोप केला.
“मनसेकडे सध्या ना आमदार आहेत ना खासदार. मात्र, मराठी मतांवर प्रभाव टाकण्याची क्षमता असल्यामुळे भाजपला मुंबई महापालिकेसाठी मनसे महत्त्वाची वाटते.” :- अशोक वानखेडे, राजकीय विश्लेषक
या पार्श्वभूमीवर फडणवीस–ठाकरे भेट म्हणजे संभाव्य युतीचा अंदाज आणि विरोधकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न मानला जातो.
या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप–मनसे युती शक्य असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीसमोर नवे आव्हान उभे राहू शकते.