अलीकडे केंद्र सरकारने त्रिभाषा धोरण अधिक ठोसपणे राबवण्याचे संकेत दिले आहेत. या धोरणामध्ये हिंदीला अनिवार्य स्थान देण्याचा प्रयत्न दिसतो आहे. यामुळे महाराष्ट्रात भाषिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकांना वाटते की ही धोरणं हळूहळू स्थानिक भाषांवर हिंदी लादण्याचा प्रकार आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या अस्मितेची नव्याने चर्चा सुरु झाली असून, अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था मराठीच्या बाजूने उभ्या आहेत.
या चर्चेमध्ये महाराष्ट्रातील पक्षांची मतमतांतरे स्पष्टपणे जाणवतात. एकीकडे शिवसेना (ठाकरे गट), मनसेसारख्या पक्षांनी आक्रमक मराठी भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे भाजपसारखे काही पक्ष ‘एक देश, एक भाषा’ ह्या अजेंडाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देताना दिसतात. काँग्रेस, राष्ट्रवादी यांसारख्या पक्षांनी शैक्षणिक धोरणांमध्ये स्थानिक भाषेला प्रथम प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. पण खरा मुद्दा कोणत्याही पक्षाच्या पक्षपातीपणाचा नसून, मराठी भाषक जनतेच्या अंत:करणातील व्यथा समजून घेण्याचा आहे.
मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हा दर्जा केवळ सन्मान नसून एक ऐतिहासिक मान्यता आहे की मराठी ही शतकानुशतकांची परंपरा लाभलेली, साहित्य, व्याकरण, ज्ञान आणि संस्कृतीने समृद्ध भाषा आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, शंकर पाटीलांपर्यंत आणि आजच्या नव्या लेखकांपर्यंत मराठीचं साहित्यिक वैभव अद्वितीय आहे. या अभिजाततेला फक्त इतिहासात जपणं पुरेसं नाही; वर्तमानात ती संजीवनीसारखी वाहणं हवी.
मराठीची खरी संपन्नता तिच्या बोलीभाषांमध्ये दिसते. कोकणी, वऱ्हाडी, माळवणी, अहिराणी, खानदेशी, आगरी अशा अनेक उपभाषा ही मराठीचं विविध रूप आहे. या बोलीभाषा प्रमाण भाषेला समृद्ध करतात, आणि प्रमाण भाषा बोलीभाषांना व्यासपीठ देते. त्यांचा परस्परसंबंध सजीव आणि सहजीवी आहे. बोलीभाषांना दुर्लक्ष करून मराठीच्या पूर्णपणाची कल्पनाही करता येणार नाही.
मातृभाषा आणि व्यक्ती यांचं नातं हे फक्त भावनिक नसून मानसिक आणि बौद्धिकही आहे. मानसशास्त्र सांगतं की, बालकाच्या मेंदूचा विकास सर्वाधिक प्रभावी होतो तो मातृभाषेतून शिकल्यास. यामुळे विचारक्षमता, निर्णयक्षमता आणि सर्जनशीलता वाढते. परंतु आज शहरी आणि निमशहरी भागात मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या घटते आहे. इंग्रजी शिक्षणाच्या हव्यासात मराठीमधील बाळसे हरवत चाललं आहे. आपली मुलं मराठी वाचू आणि लिहू शकत नसतील, तर अभिजात दर्ज्याला अर्थ काय?
भाषेचा उगम हा केवळ व्याकरणाच्या नियमांतून होत नाही. भाषा जन्मते ती समाजाच्या व्यवहारातून, दैनंदिन जीवनातून. मराठी ही ‘घराबाहेर वापरली जाणारी’ भाषा झाली पाहिजे. ती न्यायालयात, महापालिकेत, शिक्षणात, विज्ञानात, तंत्रज्ञानात, पत्रकारितेत, आणि सोशल मीडियात आत्मविश्वासाने झळकली पाहिजे. केवळ साहित्य संमेलनं भरवून किंवा अभिवादन करून नव्हे, तर प्रत्यक्षात तिचा उपयोग वाढवून आपण तिला सजीव ठेवू शकतो.
मराठीवर प्रेम करणं म्हणजे इतर भाषांचा द्वेष करणं नव्हे. इंग्रजी, हिंदी, किंवा अन्य कोणतीही भाषा शिका, पण आपल्या मातृभाषेवर अभिमान बाळगा. कारण भाषा हे अस्तित्वाचं राजकारण असतं. जी भाषा आपण नित्य वापरतो, जिच्यातून विचार करतो, तीच आपल्याला जिवंत ठेऊन जाते. म्हणूनच राजकारण, समाजकारण, शैक्षणिक धोरण, आणि तंत्रज्ञान यात मराठीचा वापर वाढवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
आजच्या घडीला, जेव्हा जागतिकीकरणाच्या लाटेत स्थानिकता हरवत चालली आहे, तेव्हा मातृभाषा ही आपली संस्कृती आणि ओळख टिकवण्याचं साधन आहे. मराठी माणूस म्हणून आपल्याला ‘मराठी’ ही केवळ भाषा नव्हे, तर एक मूल्य, एक संस्कार, एक श्रद्धा आणि एक आत्मीयता म्हणून जपणं आवश्यक आहे.